देशभरातून महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान, कुणाला संधी?
महाराष्ट्रात एकूण 13 ठिकाणी मतदान पार पडलंय. मात्र पुन्हा एकदा मतदानाची आकडेवारी काही वाढलेली दिसत नाही. संध्याकाळी 5 वाजताच्या आकडेवारीनुसार कुठं किती टक्के मतदान झालंय? या विषयी सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
शेवटच्या आणि पाचव्या टप्प्याच्या मतदानासह महाराष्ट्रात सर्व 48 जागांसाठी मतदान पार पडलं. पाचव्या टप्प्यात मुंबईच्या सर्व 6 जागांसाठीही मतदान झालं. दक्षिण मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई आहे. इथे ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधवांचा सामना आहे. संध्याकाळी 5 वाजताच्या आकडेवारीनुसार, या मतदारसंघात 44.22 टक्के मतदान झालंय. दक्षिण मध्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळेंमध्ये लढत आहेत. इथे 48.26 टक्के मतदान झालंय. उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल किर्तीकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर आमनेसामने आहेत. या मतदारसंघात 49.79 टक्के मतदानाची नोंद झालीय.
उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपच्या अॅड. उज्ज्वल निकमांमध्ये लढत आहे. या मतदारसंघात 47.32 टक्के मतदानाची नोंद झालीय. उत्तर मुंबईत काँग्रेसच्या भूषण पाटील आणि भाजपच्या पियूष गोयल यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात 46.91 टक्के मतदानची नोंद आहे. ईशान्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील आणि भाजपच्या मिहीर कोटेचांमध्ये सामना आहे, इथं 48.67 टक्के मतदान झालंय.
कल्याणमध्ये सर्वात कमी 41.70 टक्के मतदान
ठाण्यातही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारेंच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के उमेदवार आहेत. इथे 45.38 टक्के मतदानाची नोंद झालीय. तर कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून वैशाली दरेकरांविरोधात विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आहेत. इथे 41.70 टक्के मतदानाची नोंद झालीय. भिवंडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बाळ्या मामा म्हात्रेंच्या विरोधात भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील मैदानात आहेत. इथे 48.89 टक्के मतदान झालंय.
नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजेंना शिंदेंच्या शिवसेनेच्या हेमंत गोडसेंचं आव्हान आहे. इथे 51.16 टक्के मतदान झालंय. दिंडोरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे आणि भाजपच्या भारती पवारांमध्ये लढत आहे. या मतदारसंघात 57.06 टक्के मतदानाची नोंद झालीय. धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्छाव आणि भाजपच्या सुभाष भामरेंमध्ये लढत आहे. इथे 48.81 टक्के मतदान झालंय. देशभरातून पुन्हा एकदा महाराष्ट्रातच कमी मतदान झालंय. त्यामुळे त्याचा फटका कोणाला बसतो आणि सर्व 48 जागांपैकी कोणाच्या पारड्यात किती जागा जातात, हे 4 जूनला स्पष्ट होईल.