मोदींची सत्ता आली तर पाकिस्तान… निवडणूक निकालपूर्वी पाकिस्तानचा माजी परराष्ट्र सचिव काय म्हणाला?; धडकी की धमकी?
लोकसभा निवडणुकीचा कल येण्यास अवघे काही तास बाकी आहेत. दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच पाकिस्तानला धडकी भरली आहे. पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र सचिवाने भाजपच्या विजयावर चिंता व्यक्त केली आहे. भाजप जिंकल्यास पाकिस्तानला घरात घुसून मारेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात लागणार आहेत. दुपारपर्यंत देशाच्या राजकीय सत्तेचं चित्र स्पष्ट होणार आहे. आधीच एक्झिट पोलमध्ये मोदींची सत्ता येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच आता प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्याने कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, केवळ एक्झिट पोलचे आकडे पाहूनच पाकिस्तानला धडकी भरली आहे. पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र सचिवाने या एक्झिट पोलवर भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने निवडून येऊन पंतप्रधान झाल्यास आणि एनडीएला संसदेत दोन तृतियांश जागा मिळाल्यास त्यांना भारताच्या संविधानात दुरुस्ती करण्याचं बळ मिळेल. हे बळ मिळताच भारताला हिंदू राष्ट्र करण्यासाठी भाजप प्रयत्न करेल, असा दावा पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी 543 जागांपैकी 272 जागांची आवश्यकता असते. अनेक एक्झिट पोलने मोदी सरकार येणार असल्याचं म्हटलं आहे. मोदी सरकारला 300च्या वर जागा मिळतील असं एक्झिट पोलमधून स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी जियो न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत ही भीती वर्तवली आहे. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्यात आल्याचा मुद्दाही मांडला. भाजपकडून निवडणूक प्रचाराच्यावेळी जे सांगितलं जातं, सत्तेत येताच ते पूर्ण केलं जातं, असं एजाज चौधरी यांनी सांगितलं.
हिंदू राष्ट्र बनवतील
आतापर्यंत आम्ही जे पाहिलं आहे… मोदींनी निवडणूक प्रचारात जे सांगितलं, त्याची प्राधान्याने अंमलबजावणी केली आहे. 2019च्या निवडणुकीत त्यांनी 370 कलम हटवण्याचा उल्लेख केला होता. सत्तेत आल्यानंतर त्यांनी लगेच हे कलम हटवलं. यावेळी ते हिंदू राष्ट्र बनवण्यावर भर देतील असं मला वाटतं. त्यासाठी त्यांनी आधीपासूनच काम सुरू केलेलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
इतर धर्मियांच्या अडचणी
भारतात हिंदू बहुसंख्याक आहेत, त्यामुळे भारत हिंदू राष्ट्र झाला तर पाकिस्तानला त्याचा काही आक्षेप नाही. आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही. मात्र, भाजप आधीच मुस्लिम आणि इतर धर्मियांसाठी अडचणी निर्माण करत होते. आता भारत हिंदू राष्ट्र झाल्यास या धर्मियांच्या अडचणी वाढणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.
पाकिस्तानला घुसून मारेल
प्रचंड बहुमतात भाजप सत्तेत आल्यावर भारताची पाकिस्तानबाबतची काय भूमिका असेल? पाकिस्तानने त्यांची तयारी केली पाहिजे. सत्तेत आल्यानंतर भारत इतर देशात घुसून मारेल. त्यातही पाकिस्तानात घुसून पाकिस्तानी नागरिकांना मारेल. ही प्रवृत्ती वाढेल. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा चिंतेचा विषय आहे. मला वाटतं बाकी देशांसाठी सुद्धा ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे पाकिस्तानने आताच सावध राहून तयारी केली पाहिजे. मात्र, भाजप किती जागा जिंकून सत्तेत येईल हे सांगता येत नाही, असंही ते म्हणाले.