धर्मावरून पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्र बनवलं तर भारताला..; कंगनाचं वक्तव्य चर्चेत
अभिनेत्री कंगना राणौतचं नवं वक्तव्य चर्चेत आलं आहे. भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याबद्दल तिने हे वक्तव्य केलं आहे. भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं घोषित झाल्यापासून कंगना सतत चर्चेत आहे.
हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचं घोषित झाल्यापासून अभिनेत्री कंगना राणौत सतत चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्यासाठी कंगना जोरदार प्रचार करत आहे. नुकतंच तिने हिंदू राष्ट्रासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. कुल्लूमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान कंगना म्हणाली, “1947 मध्ये जेव्हा धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनवलं गेलं होतं. तर त्यावेळी भारताला हिंदू राष्ट्र घोषित का केलं नाही?”
कंगना पुढे म्हणाली, “आपले पंतप्रधान हे युगपुरुष आहेत. आपल्या पूर्वजांनी मुघलांची गुलामी पाहिली, त्यानंतर इंग्रजांची गुलामी पाहिला आणि त्यानंतर काँग्रेसचं कुशासन पहायला मिळालं. पण आपल्याला खऱ्या अर्थाने 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. विचार करण्याचं स्वातंत्र्य, सनातनचं स्वातंत्र्य, आपला धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य, या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं स्वातंत्र्य. जेव्हा 1947 मध्ये आपल्या धर्माच्या आधारवर पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्र बनवलं गेलं, तेव्हा भारताला हिंदू राष्ट्र का घोषित केलं नाही? याला आम्ही हिंदू राष्ट्र बनवू.”
View this post on Instagram
कंगनाने याआधीही अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. नोव्हेंबर 2021 मध्ये ती म्हणाली होती, “या देशाला खरं स्वातंत्र्य 1947 मध्ये नाही तर 2014 मध्ये मिळालं.” तिच्या या वक्तव्यावरून तेव्हा बराच वाद निर्माण झाला होता. हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघात कंगनाची टक्कर काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघासाठी येत्या 1 जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोघांनी एकमेकांवर बरीच टिकाटिप्पणी केली.
भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी दिल्यानंतर राज्यातील एकमेकांशी भांडणारे काँग्रेसचे नेते एकत्र आले आहेत. इतकंच नव्हे तर हिमाचल प्रदेशातील दोन मोठ्या राजघराण्यांचीही कंगनाविरोधात छुपी एकजूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्यासाठी कंगना जोरदार प्रचार करत आहे. एका रॅलीदरम्यान कंगनाकडून मोठी चूक झाली होती. राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांचं नाव घेण्याऐवजी तिने चुकून तिच्याच पक्षातील म्हणजेच भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचं नाव घेतलं होतं. मासे खाण्यावरून कंगनाला तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधायचा होता.