महाराष्ट्रातील जनतेचा फोडाफोडीच्या राजकारणाला करारा जवाब?; एक्झिट पोलमध्ये महायुती वरचढ की महाविकास आघाडी?
महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींचा मोठा परिणाम जनतेच्या मनावर पडला आहे. महाराष्ट्रात घडलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता काय उत्तर देते? याकडे संपूर्ण नागरिकांचं लक्ष होतं. अखेर एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, जनतेने फोडाफोडीच्या राजकारणाला सडेतोड उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन वर्षांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहेत. पण या दोन पक्षांमध्ये मोठी फूट पडली. विशेष म्हणजे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठं बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण अक्षरश: ढवळून निघालं. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर एक वर्षांनी विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वाधिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडींचा महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनावर खोलवर परिणाम पडला. या दोन्ही पक्षांमध्ये पडलेली फूट ही गाव-खेड्यांमध्ये अगदी घराघरापर्यंत येऊन पोहोचली होती. त्यामुळे नागरिकांचा नेमका मूड काय आहे? हे जाणून घेण्यासाठी लोकसभा निवडणूक हे महत्त्वाचं माध्यम आहे.
विशेष म्हणजे राज्यात सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक असणार आहे. त्याआधी लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. या एक्झिट पोलची आकडेवारी महाराष्ट्रापुरता पाहिली तर राज्याच्या जनतेने फोडाफोडीच्या राजकारणाला करारा जवाब दिला आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात महायुतीला सर्वात मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाला साधं खातंही उघडता येणार नाही, असा अंदाज आहे. तर शिंदे गटाला केवळ 4 जागांवर यश मिळण्याची शक्ता आहे. महाराष्ट्रात महायुतीला केवळ 22 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला तब्बल 25 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही महायुतीला वरचढ ठरण्याची शक्यता आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा?
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. पण गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा भाजपला 22 जागांवर यश मिळालं होतं. हाच आकडा यावर्षी 18 जागांवर येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाला 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ शरद पवार गटाला 6, काँग्रेसला 5, शिंदे गटाला 4 आणि अजित पवार गटाला एकाही जागेवर यश मिळणार नाही, असा अंदाज आहे.
कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?
- नागपूर – भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर, काँग्रेसचे विकास ठाकरे पिछाडीवर
- बीड – भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आघाडीवर, शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे पिछाडीवर
- चंद्रपूर – भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर
- बारामती – शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आघाडीवर, अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार पिछाडीवर
- अहमदनगर – शरद पवार गटाचे निलेश लंके आघाडीवर, भाजपचे सुजय विखे पिछाडीवर
- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ – काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर, भाजपचे उज्ज्वल निकम पिछाडीवर
- सांगली – ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील पिछाडीवर, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर