ठाकरे- पवार इज बॅक… आता बंडखोर काय करणार?; विधानसभेपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी?
लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोल आले आहेत. या पोलनुसार राज्यात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्व आणि पक्षावरच मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचं दिसून येत आहे. तसेच फोडाफोडीच्या राजकारणाला मतदारांनी तिलांजली दिल्याचंही या आकडेवारीतून दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आले आहेत. या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे एनडीएला रोखण्याचं इंडिया आगाडीचं स्वप्न भंगताना दिसत आहे. महाराष्ट्रात मात्र काहीसा वेगळा निकाल लागताना दिसत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळताना दिसत आहे. तर महायुतीला तुलनेने कमी जागा मिळताना दिसत आहे. महायुतीत फक्त भाजपची कामगिरी चांगली झालेली दिसत आहे. तर महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाची कामगिरी चांगली झालेली दिसत आहे. पक्ष फुटल्यानंतर आणि पक्ष हातातून गेल्यानंतरही नव्या चिन्हावर लढून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मोठं यश मिळाल्याने दोन्ही पक्षातून बंड करून गेलेल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीला फक्त 22 जागा मिळताना दिसत आहे. तर महाविकास आघाडीला 25 जागा मिळताना दिसत आहे. म्हणजेच 22 जागांचं नुकसान होताना दिसत आहे. राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला सर्वाधिक 18 जागा मिळताना दिसत आहेत. तर शिंदे गटाला 4 जागा मिळताना दिसत आहेत. अजितदादा गटाला मात्र एकही जागा मिळणार नसल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे.
महायुतीला नुकसान
महाराष्ट्रात भाजपचे 22 खासदार होते. यावेळी त्यांचे चार खासदार पडताना दिसत आहेत. भाजपला चार जागांचं नुकसान होताना दिसत आहे. तर शिंदे गटाचे 13 खासदार होते. पण त्यापैकी केवळ चार खासदारच निवडून येताना दिसत आहेत. म्हणजे शिंदे गटाला 9 जागांचे नुकसान होताना दिसत आहे. तर दुसरीकडे अजितदादांकडे एक खासदार होता. तोही या निवडणुकीत पराभूत होत असल्याचा एक्झिट पोल सांगतो.
ठाकरे, पवार, काँग्रेसला फायदा
महाविकास आघाडीत मात्र यंदा जल्लोषाचं वातावरण आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 14 जागा मिळताना दिसत आहेत. तर शरद पवार गटाला 6 आणि काँग्रेसला 5 जागा मिळताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 5 खासदार होते. मात्र, आता हा आकडा 14 वर जाताना दिसत आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीत 9 जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर शरद पवार यांच्याकडे तीन खासदार होते. त्यांच्या खासदारांची संख्या 6 वर जाताना दिसत आहे. म्हणजेच शरद पवार यांना तीन जागांचा फायदा होताना दिसत आहे. काँग्रेसचा राज्यात एकच खासदार होता. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात काँग्रेसचे पाच खासदार निवडून येत आहेत. म्हणजेच काँग्रेसच्या खासदारांची संख्या चारने वाढताना दिसत आहे.
बंडखोरांचं काय?
लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हातून पक्ष गेला, चिन्ह गेलं तरीही त्यांना यश मिळताना दिसत आहे. याचाच अर्थ या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केलं असा होत आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि अजितदादा गटात चुळबुळ होण्याची शक्यता आहे. लोकसभेला हा निकाल लागला तर विधानसभा आणि महापालिकेत काय होईल? अशी भीती या बंडखोरांना वाटू शकते. त्यामुळे विधानसभेपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी घडू शकतात, असा अंदाज राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.