India Alliance Meeting : उद्धव ठाकरेंसाठी इंडिया आघाडीची बैठक थांबली, दिल्लीतून तातडीने निरोप
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक थांबवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी बैठकीला यावं, अशी विनंती दिल्लीत असलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. त्यांचा निरोप ऐकल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे सुद्धा दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एनडीए सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. मग इंडिया आघाडीचे नेते एनडीएच्या या दाव्यातील हवा काढण्यात यशस्वी होतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत कोणत्या एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. पण एनडीएला 290 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. देशात सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागा आवश्यक आहेत. एनडीएकडे सध्या बहुमत आहे. पण भाजपकडे बहुमत नाही. याउलट आता एनडीएत लहान पक्षांची बार्गेनिंग पावर वाढली आहे. इंडिया आघाडीत कधी एकेकाळी राहिलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या एनडीएसोबत आहेत. पण इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले तर ते इंडिया आघाडीकडे येऊ शकतात. याशिवाय चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पार्टी हा पक्ष देखील इंडिया आघाडीत सहभागी झाला तर देशात मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मला ब्रेक लागू शकतो.
एकीकडे एनडीएकडून सरकार स्थापनेचा दावा केला जातोय. तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या गोटात जोरदार खलबतं सुरु आहेत. इंडिया आघाडीची आज बैठक बोलावण्यात आली आहे. दिल्लीत ही बैठक पार पडत आहे. या बैठकीचं उद्धव ठाकरे यांनासुद्धा निमंत्रण आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत हे दिल्लीला बैठकीला गेले आहेत. पण इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना या बैठकीला हजर राहण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी बैठक थांबवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमके काय खल होतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
इंडिया आघाडीच्या नेत्यांची ठाकरेंना विनंती काय?
तुम्ही बैठकीला या, अशी विनंती इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी इंडिया आघाडीची बैठक थांबवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे दिल्लीत गेल्यानंतरच इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या विनंतीनंतर आता उद्धव ठाकरे दिल्लीला बैठकीसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सरकार स्थापनेबाबत चर्चा केली जाणार आहे. सरकार स्थापनेसाठी जागांची जुळवाजुळव कशी करायची? याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.