Loksabha election: माढा लोकसभा मतदारसंघात भाजपसाठी धोक्याची घंटा
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक इच्छूक उमेदवार असले तर भाजपकडून पुन्हा रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना यांनाच संधी दिली आहे. त्यामुळे आता बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Mhada Loksabha election : आमचं ठरलंय म्हणत विजयसिंह मोहिते-पाटलांचे बंधू जयसिंह मोहिते-पाटलांचा व्हिडीओ व्हायरल झालाय. दुसरीकडे माढ्यातल्या उमेदवारीबाबत काय निर्णय घ्यायचा, हे दोन ते तीन दिवसात ठरवणार असल्याचं रामराजे निंबाळकरांनी म्हटलंय. माढ्यात मोहिते पाटलांचं जवळपास ठरल्याचं बोललं जातंय. मोहिते पाटलांचे बंधू बाळदादा मोहितेंचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
धैर्यशील मोहिते पाटील होते इच्छूक
भाजपनं स्थानिक विरोधाला डावलून पुन्हा रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना तिकीट दिल्यानं आमचं ठरलंय म्हणत बाळदादा मोहितेंचा व्हिडीओ व्हायरल झालाय. माढा लोकसभेत मोहितेंचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील भाजपकडून इच्छूक होते. त्यांनी अनेक दिवसांपासून त्याची तयारीही सुरु केली होती. मात्र भाजपनं मोहितेंचे विरोधक रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना पुन्हा तिकीट दिल्यानं नाराजी पसरली.
गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही धैर्यशील मोहितेंनी करमाळ्यात प्रचाराची सुरुवात केलीय. त्यामुळे मनधरनीचे प्रयत्न अपयशी ठरल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे फलटणमधून अजित पवारांचे नेते रामराजे निंबाळकरांचाही रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना विरोध होता.
देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेतल्यानंतर रामराजेंची नाराजी दूर झाल्य़ाची बातमी आली. मात्र त्या सर्व अफवा असून अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं रामराजेंनी म्हटलंय.
पुन्हा रणजितसिंहांना संधी
काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि सुनिल तटकरेंचा फोटो हटवून रामराजे निंबाळकरांनी भाजपच्या रणजितसिंहांविरोधात सभा घेतल्या होत्या. त्या विरोधाला न जुमानता भाजपनं पुन्हा रणजितसिंहांना संधी दिल्यानं वाद उफाळून आला आहे.
माढा मतदारसंघात मोहितेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यात मोहितेंच्या बंधूंनीच आमचं ठरलंय म्हणून विधान करणं ही भाजपसाठी धोक्याची घंटा ठरु शकते.
2019 ला भाजपचे निंबाळकर राष्ट्रवादीच्या बबन शिंदेंविरोधात 85764 मतांनी जिंकले होते. राष्ट्रवादीला करमाळा, माढा आणि सांगोल्यात लीड मिळालं होतं. माळशिरस, माण, फलटणमध्ये निंबाळकर पुढे होते. पण निंबाळकरांच्या 85 हजारांच्या विजयी मताधिक्क्यांत एकट्या मोहिते पाटलांच्या माळशिरसचा वाटा १ लाखांचा होता. त्यामुळे आता इथे भाजपची डोकेदुखी वाढू शकते.