Nandurbar Lok Sabha 2024 : भाजपाच्या हिना गावित यांची हॅट्रीक होणार ? की कॉंग्रेसचे गोवाल पाडवी खाते उघडणार
उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा असलेल्या नंदूरबार लोकसभेत यंदा भाजपाच्या उमेदवार हिना गावित यांची हॅट्रीक होते की कॉंग्रेसचे गोवाल पाडवी यांचे खाते उघडते याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. कॉंग्रेस नेत्यांनी आणि भाजपाच्या नेत्यांनी या आदिवासी जिल्ह्यांकडे यंदा अधिक लक्ष्य दिले आहे. कॉंग्रेसला आपले गतवैभव पुन्हा मिळवायचे आहे तर भाजपाला आपला दबदबा कायम राखायचा आहे.
नंदूरबार हा लोकसभा मतदार संघात यंदा भाजपाच्या दोन वेळा विजयी खासदार हिना गावित आणि कॉंग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यात मुख्य लढत होत आहे. हा लोकसभा मतदार संघ एकेकाळी कॉंग्रेसचा बाले किल्ला म्हटला जात होता. मात्र 2014 साली या मतदार संघात मोदी लाटेत डॉ. गावित निवडून आल्यानंतर मात्र या मतदार संघात भाजपाची लाट आली. हिना गावित यांची यंदा हॅट्रीक होते की कॉंग्रेसच्या पेशाने वकील असलेले गोवाल पाडवी यांचे खाते उघडते याची उत्सुकता सर्वत्र लागली आहे. यंदा कॉंग्रेसचे एकदम नवा चेहरा दिला आहे. या नंदूरबार लोकसभा 2024 मतदार संघात अक्कलकुवा, शहादा, नवापूर, साक्री, शिरपूर असे सहा विधानसभा मतदार संघ मोडतात. हे सर्व मतदार संघ अनुसुचित जमातीचे आहेत.
नंदूरबार लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान झाले. या मतदार संघात प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेस नेते प्रियंका गांधी यांची सभा झाली होती. तसेच राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा देखील नंदूरबार येथे प्रवेश झाला होता. याचा फायदा कॉंग्रेसला होतो का ? हे महत्वाचे आहे. हिना गावित यांना संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. या लोकसभा मतदार संघात भाजपाने केलेल्या कामाच्या जोरावर विकासाच्या मुद्द्यांवर मते मागितली होती. परंतू नंदूरबार आदिवासी जिल्हा असून येथील समस्या काही सुटलेल्या नाहीत. तसेच कॉंग्रेसने दिलेल्या उमेदवारावर टीका करण्यासाठी कोणताही मुद्दा हिना गावित यांच्याकडे नव्हता. त्यामुळे भाजपाच्या हिना गावित आणि कॉंग्रेसचे गोवाल पाडवी या तरुण उमेदवारांना यंदा मतदार कसा प्रतिसाद देतात यावर येथील सर्व गणित अवलंबून आहे.
नंदूरबार जिल्ह्याची सत्ता हिना गावित यांचे वडील विजयकुमार गावित अनेक वर्षे आमदार आणि मंत्री राहीले आहेत. नंदूरबार अक्कलकुवा यांचे कॉंग्रेस नेते माजी मंत्री के.सी.पाडवी यांचे चिरंजीव गोवाल पाडवी यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. त्यामुळे यंदा कॉंग्रेसने सुशिक्षित असलेल्या पाडवी यांना तिकीट दिले आहे. 2019 साली के.सी. पाडवी यांचा पराभव भाजपाच्या हिना गावित यांनी केला होता. दरम्यान, मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण 289 हॉलमध्ये 4,309 मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स