आणखी एक बॉम्ब… काही महिन्यातच मोदी सरकार कोसळणार; इंडिया आघाडीच्या बड्या नेत्याचा दावा
लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आता सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. त्यासाठी एनडीएच्या नेत्यांनी राष्ट्रपतींकडून वेळही घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या घडामोडींकडे लागलं आहे.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने आता सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी काल एनडीएची बैठक झाली. या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, इंडिया आघाडीच्या एका बड्या नेत्याने मोदींच्या सरकारबाबतची मोठी भविष्यवाणी केली आहे. काही महिन्यातच मोदी सरकार पडेल, असा दावा या नेत्याने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
विडुदलाई चिरुतैगल कच्ची या पक्षाचे म्हणजे दलित पँथर ऑफ इंडियाचे नेते थोल थिरुमावलवन यांनी हा दावा केला आहे. इंडिया ब्लॉकच्या नेत्यांनी काल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी मिटींग केली. यावेळी आम्ही सद्यस्थितीवर चर्चा केली. भाजप पाच वर्ष स्थिर सरकार देणार नाही, असं आम्हाला वाटतं. काही महिन्यात, त्यांना त्यांच्या आघाडीतील समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. हे सरकार जास्त दिवस चालणार नाही. तेव्हा योग्यवेळी आम्ही योग्य पावलं उचलणार आहोत, असं थिरुमावलवन यांनी सांगितलं.
इंडिया आघाडीच्या सातत्याने चर्चा
लोकसभा निवडणुकीत एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडीला केवळ 232 जागा मिळाल्या आहेत. एनडीएकडे बहुमताचा आकडा आहे. पण सरकार बनवण्यात जेडीयू आणि टीडीपीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हे दोन्ही पक्ष एनडीएतून बाहेर पडले तर इंडिआ आघाडीचा सरकार बनवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी या दोन्ही पक्षांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. मात्र, टीडीपी आणि जेडीयूने इंडिया आघाडीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
टीडीपी प्रवक्ता काय म्हणाला?
टीडीपी प्रवक्ते प्रेम कुमार जैन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्राबाबूंनी काल एनडीएला पाठिंबा दिला आहे. इंडिया आघाडीने काहीही म्हणू द्या, आम्ही एनडीएसोबतच आहोत. चंद्राबाबू नायडू 12 जून रोजी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. याशिवाय एनडीएचे अनेक नेते या सोहळ्याला येणार आहेत, अशी माहिती प्रेम कुमार जैन यांनी दिली आहे.