पुणे लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार, पाहा कोणामध्ये होणार कांटे की टक्कर
Pune Loksabha election : पुणे लोकसभा निवडणुकीची चूरस आता आणखी वाढणार आहे. कारण वसंत मोरे या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक आहेत. आपण शंभर टक्के निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
Pune Loksabha : पुण्यात लोकसभेच्या उमेदवारीसाठी अनेक जण उत्सूक आहेत. या दरम्यान वसंत मोरे यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता पुणे लोकसभेतून वसंत मोरे वंचितकडून लढणार अशी शक्यता आहे. आंबेडकरांसोबत चर्चा सकारात्मक झाल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत आणि आंबेडकरांनीही 2 एप्रिलपर्यंत जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. पुणे लोकसभेत महायुतीकडून मुरलीधर मोहोळ भाजपचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकरांना काँग्रेसनं तिकीट दिलंय. आता वसंत मोरे यांनीही उडी घेतली असून वंचितचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
प्रकाश आंबेडकरांनी पहिली यादी जाहीर करुन स्वतंत्र लढण्याचे संकेत दिलेलेच आहेत. त्यांची महाविकास आघाडीसोबत चर्चा थांबली आहे. त्यातच आता जरांगे पाटलांसोबत नवं समीकरण तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. 30 मार्चपर्यंत जरांगेंनी वेळ मागितला आहे. त्यामुळं पुढच्या 2 दिवसांत नवं समीकरण समोर येईल असं आंबेडकर म्हणत आहेत.
प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊतांमध्ये शाब्दिक चकमकही सुरु झाली आहे. राऊत महाविकास आघाडीत बिघाडी करत असल्याचा थेट आरोप आंबेडकरांनी केला आहे. इकडे रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांच्या स्वतंत्र भूमिकेचं स्वागच करत दलित मतं भाजपलाच मिळणार असल्याचं म्हटलं आहे. आंबेडकरांनी स्वतंत्र लढावं पण दलित मतं माझ्यामुळं भाजपला मिळतील असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
पुण्यात नवी समीकरणं
लोकसभा निवडणुकीच्या आधी पुणे लोकसभा मतदारसंघात नवी समीकरणं जुळू लागले आहेत. त्यामुळे पुण्यात कांटे की टक्कर पाहायला मिळू शकते. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिला. त्यांना महाविकासआघाडीकडून उमेदवारी मिळेल अशी चर्चा असतानाच काँग्रेसने येथून रविंद्र धंगेकरांचं नाव जाहीर करुन टाकलं. त्यामुळे वसंत मोरे यांना वंचितचा आता आसरा घ्यावा लागला आहे.
वसंत मोरे यांची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘वसंत मोरे यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली. अधिकृत निर्णय ३१ मार्च पर्यंत जाहीर करू. महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल यासाठी मी आताच चर्चा जाहीर करत नाही.’