शरद पवार गटाकडून आचारसंहिता भंगाची तक्रार, शिंदे गट आणि भाजप गोत्यात?
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसने सर्वात आधी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. आता शरद पवार गटाने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात सुप्रिया सुळे आणि अभिनेता अमोल कोल्हे यांच्या नावाचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून एकमेकांची उणीदुणी काढली जात आहे. आयाराम गयारामांचीही चलती सुरू झाली आहे. या सर्व धामधुमीत शरद पवार गटाने शिंदे गट आणि भाजपवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत आपल्याच पक्षाच्या नेत्यांची नावे दिली जातात. दुसऱ्या पक्षाची नावे दिली जात नाही. शिंदे गट आणि भाजपने आपल्या यादीत एकमेकांच्या पक्षातील नेत्यांचा समावेश केला आहे. हा आदर्श आचरसंहितेचा भंग असून याप्रकरणी कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. कालपासून स्टार प्रचारकांची यादी येत आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे एक तक्रार केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या यादीत दोन चुका आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीत व्यक्तीच्या नावापुढे त्यांचं पद लिहिलं जात नाही. तो नियमभंग ठरतो. पण शिंदे गटाच्या यादीत नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावापुढे पदं लिहिण्यात आली आहेत. हे चुकीचं आहे. आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
ती नावे टाकू शकत नाही
भाजपने त्यांच्या यादीत 12 आणि 13व्या नंबरवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं नाव नमूद केलंय. सेक्शन 77 नुसार यादीत कुणाचं नाव घेऊ शकता आणि कुणाचं नाही हे यात नमूद केलं आहे. अशा प्रकारे नाव घेतली असेल तर निवडणुका होईपर्यंत त्यांच्यावर बंदी घालण्याचा आयोगाला अधिकार आहे. तसा कायदा आहे. आपल्या पक्षाच्या यादीत दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची नावे घेऊ शकत नाही. भाजप आणि शिंदे गटाने जी नावे टाकली तो निवडणूक आयोगाचा भंग आहे, असं आव्हाड यांनी सांगितलं.
याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची मागणी केली आहे. आयोगाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असंही ते म्हणाले. शिंदे गटाने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. तर भाजपनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती.