‘तुम्ही तुलसी म्हणूनच..’; लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लिहिलेल्या पोस्टमुळे स्मृती इराणी ट्रोल
2019 मध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांचा 4,68,514 मतांनी विजय झाला होता. तर काँग्रेसच्या राहुल गांधी यांना 4,13,394 लोकांनी मत दिलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसच्या केएल शर्मा यांनी स्मृती इराणींना दणका दिला आहे. या पराभवानंतर इराणींनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे.
यंदाचा लोकसभा निवडणुकीचा निकाल अनेक दृष्ट्यांनी आश्चर्यकारक ठरला. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अर्जुन मुंडा, राजीव चंद्रशेखर, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, अजय मिश्रा टेनी या केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला. अमेठी मतदारसंघात काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी स्मृती इराणींना तब्बल 1 लाख 67 हजार 196 मतांनी हरवलं. 2019 मध्ये याच मतदारसंघात स्मृती इराणींनी काँग्रेसच्या राहुल गांधींना 55 हजार मतांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे इराणींचा आताचा पराभव म्हणजे भाजपला मोठा धक्का मानला जातोय. या पराभवानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
स्मृती इराणी यांची पोस्ट-
‘जीवन हे असंच आहे.. माझ्या आयुष्यातील एक दशक हा एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यात, जीवन घडवण्यात, आशा-आकांक्षा जोपासण्यात, पायाभूत सुविधांवर काम करण्यात, रस्ते-नाले, खडंजा, बायपास, वैद्यकीय महाविद्यालये आणि इतर बऱ्याच गोष्टींमध्ये गेला. माझ्या पराभव आणि विजयात जे लोक पाठिशी उभे राहिले त्यांची मी सदैव ऋणी आहे. जे आज यश साजरा करत आहेत, त्यांचंही अभिनंदन आणि जे असा प्रश्न विचारत आहेत की ‘हाऊ इज द जोश?’ त्यांना मी सांगू इच्छिते की इट्स स्टिल हाय, सर’, अशी पोस्ट स्मृती इराणींनी लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.
Such is life… A decade of my life going from one village to another, building lives, nurturing hope & aspirations, working on infrastructure ― roads, naali, khadanja, bypass, medical college and more.
To those who stood by me through loss and victory, I am forever grateful. To…
— Smriti Z Irani (Modi Ka Parivar) (@smritiirani) June 4, 2024
‘तुम्ही तुमच्या अहंकारामुळे ही निवडणूक हरलात’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुम्ही तुमच्या पराभवासाठी अमेठीतील जनतेला का कारणीभूत ठरवत आहात? तुमच्या अहंकाराची किंमत तुम्हाला अमेठीतच मोजावी लागली’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘आयुष्यातील धडा.. लोकांना कधीच कमी लेखू नका’, अशीही कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे. तुम्ही तुलसीच्याच भूमिकेसाठी योग्य होता, असं काहींनी म्हटलं आहे.
अमेठी लोकसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी आणि भाजपच्या स्मृती इराणी यांच्यात टक्कर झाली होती. स्मृती इराणींनी राहुल यांना हरवत 2014 मध्ये झालेल्या पराभवाचा सूड घेतला होता. आता काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी त्यांना हरवत पुन्हा एकदा अमेठीची जागा आपल्याकडे घेतली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्मृती इराणींनी किशोरी लाल यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी किशोरी लाल शर्मा यांना ‘चौकीदार’ म्हटलं होतं. यंदा काँग्रेस अमेठीसोबतच रायबरेली मतदारसंघातूनही हरणार, असा विश्वास इराणींनी व्यक्त केला होता.