‘या’ तीन भागातून भरभरुन मतदानामुळे अनिल देसाईंनी पलटवली बाजी, दिग्गज राहुल शेवाळेंना बसला धक्का
South Central Mumbai lok sabha Election Final Result 2024 : दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासाठी विजय सोपा मानला जात होता. पण प्रत्यक्षात घडलं उलटच. फारशी ओळख नसलेले अनिल देसाई विनर ठरले. हे कसं शक्य झालं? देसाईंच्या विजयाला काय कारण ठरली? जाणून घ्या.
लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल काल जाहीर झाले. दक्षिण मध्य मुंबईतून धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात सामना होता. राहुल शेवाळे हे 2014 पासून या लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. अनिल देसाई हे दोन टर्मपासून राज्य सभेवर खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. 2022 मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यावेळी राहुल शेवाळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. राहुल शेवाळे यांच्यासाठी तुलनेने ही सोपी लढाई मानली जात होती. मागच्या दोन टर्मपासून राहुल शेवाळे खासदार होते. मतदारसंघात त्यांचा तगडा जनसंपर्क होता. तुलनेने अनिल देसाई यांचा चेहरा मतदारसंघात फार ओळखीचा नव्हता. जनसंपर्क तेवढा नव्हता. राहुल शेवाळे हे खासदार होण्याआधी नगरसेवक होते. त्यामुळे राहुल शेवाळे हे सहज विजयी होतील असा अंदाज होता.
दक्षिण मध्य मुंबईत अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. अणुशक्ती नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आमदार आहेत. चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर आमदार आहेत. धारावीमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार आहेत. सायन कोळीवाड्यातून भाजपाचे कॅप्टन तामिळ सेल्वन आमदार आहेत. वडाळ्यामधून भाजपाचे कालिदास कोळंबकर आणि माहिममधून शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आमदार आहेत. या लोकसभा क्षेत्रात महायुतीचे चार आणि मविआचे दोन आमदार होते. पक्षीय बलाबलमध्ये राहुल शेवाळे यांची बाजू वरचढ होती. पण तरीही ते हरले.
‘या’ तीन भागातून ठाकरे गटाला सर्वाधिक मतदान
राहुल शेवाळे यांच्यासाठी पहिल्या फेरीची मतमोजणी समाधानकारक होती. त्यांना 20,420 मत मिळाली होती. अनिल देसाई यांना 18,807 मत मिळाली होती. पण दुपार होईपर्यंत अनिल देसाई यांची आघाडी 50 हजारपर्यंत गेली. शेवाळे यांच्या पराभवाच चित्र स्पष्ट होत गेलं. माहिम विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 57.97% टक्के मतदान झालं होतं. वडाळ्यातून 57.11% मतदान झालेलं. धारावीमधून सर्वात कमी 48.52% टक्के मतदान झालेलं. अणुशक्ती नगर, चेंबूर आणि धारावी या तीन भागातून अनिल देसाई यांना सर्वाधिक मतदान झालं.