Maharashtra Political News LIVE : मुंबईत महायुती VS महाविकास आघाडी, सभांचा धडाका
Maharashtra Political News LIVE in Marathi : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आज सभांचा मोठा धडाका उडताना दिसत आहे. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी आता फक्त एक दिवस बाकी आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर महायुतीकडून सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील सभेला उपस्थित राहणं हे या सभेचं वैशिष्ट्य आहे. महायुतीच्या या सभेला टक्कर म्हणून महाविकास आघाडीकडून मुंबईत बीकेसी मैदान येथे सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आले आहेत.
लवकरच देशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात सर्व 48 लोकसभा मतदारसंघात मतदान पूर्ण होणर आहे. मुंबई, ठाणे या शहरी भागात येत्या 20 मे रोजी सोमवारी मतदान होत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोघांसाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे. आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानात महायुतीची भव्य सभा पार पडत आहे. त्याचवेळी बीकेसी ग्राऊंडवर महाविकास आघाडीची सभा पार पडत आहे.
मुंबईत प्रचाराच्या दृष्टीने आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहेत. राजकारणातील हा एक दुर्मिळ योग असेल. महायुती आणि महाविकास आघाडीच्या सभेमुळे मुंबईच्या वाहूतक व्यवस्थेतही काही बदल करण्यात आले आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
नरेंद्र मोदी शिवाजी पार्क मैदानावर दाखल
नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दाखल झाले आहेत.
-
संविधान बदलण्याची भाषा सुरू आहे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे : अजित पवार
“देशात सात टप्प्यात निवडणुका होत आहे. पाचव्या टप्प्यात मुंबईच्या सहा, भिवंडी, कल्याण, ठाणे, पालघर, धुळे दिंडोरी आणि नाशिकमध्ये निवडणुका होत आहे. मोदींचं नेतृत्वच आपल्याला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. त्यामुळेच मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. विरोधकांना मुद्दा राहिला नाही. आम्ही विकासाबाबत बोलतोय. पण विरोधक त्याला फाटा देत आहे. नको ती भाषण करत आहेत. त्रयस्थ नागरिक म्हणून पाहिलं तर काय त्यांची भाषणं आहेत, काय शब्द वापरतात. आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं. मोदींनी संविधान साजरा सुरू केला. पण तरीही संविधान बदलण्याची भाषा सुरू झाली आहे. ते कुठे तरी थांबलं पाहिजे. ते काम तुमच्या मतातून करता येईल. तुम्ही मतदान केलं तर विरोधकांना जशास तसं उत्तर देता येईल”, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी चैत्यभूमीवर दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. नरेंद्र मोदी यांनी चैत्यभूमी इथे दाखल होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. यानंतर ते सभास्थळाकडे रवाना झाले आहेत.
-
‘उद्धजी आपले आता महाराष्ट्रात चालणार नाहीत नखरे कारण…’, आठवलेंचा कवितेतून ठाकरेंवर निशाणा
महायुतीच्या सभेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “उद्धजी आपले आता महाराष्ट्रात चालणार नाहीत नखरे कारण आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग त्यांच्याकडे तुम्ही का गेलात उद्धव ठाकरे? उद्धवजी तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला पण ४ तारखेला आम्हीच देणार आहोत जबरदस्त टोला”, अशा काव्यमय रुपात रामदास आठवले यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय.
“बौद्ध समाजात गैरसमज करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांना भेटल्यानंतर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र करण्याचा प्रयोग केला. शिवशक्ती आणि भीमशक्ती इथे आहेत”, असं रामदास आठवले म्हणाले. “नरेंद्र मोदी या देशाचे घोंघावणारे आहेत तुफान, राहुल गांधी जी तुम्ही या देशात करत आहात घाण”, अशा कवितेतून आठवलेंनी निशाणा साधला.
-
सभेला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती राहणार आहे. चैत्यभूमीवर अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान पुढे सावरकर स्मारक येथे जात अभिवादन करतील, आणि पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील. त्यानंतर नरेंद्र मोदी महायुतीच्या सभास्थळी पदार्पण करतील
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत महायुतीची छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्रित येत आहे हेच या सभेचं मोठं वैशिष्ट्य मानलं जात आहे.
-
बीकेसीचं मविआच्या सभास्थळी व्हीआयपी गेटवरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
महाविकास आघाडीच्या सभेच्या व्हीआयपी गेटवरून प्रवेश मिळवण्यावरुन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पोलिसांची बाचाबाची झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकऱ्यांना व्हीआयपी गेटवरून प्रवेश न मिळाल्याने पोलिसांसोबत बाचाबाची झाली आहे.
-
अजित पवार सभास्थळी दाखल
महायुतीच्या सभेस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार मंचावर दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते शिवाजी पार्क येथे दाखल झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सभास्थळी दाखल होत आहेत.
-
शिंदे-फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या प्रमुख नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घराबाहेर झालेल्या गर्दीला हात सुद्धा दाखवला आहे. बंगल्याच्या पहिल्या माळ्यावरून गॅलरीतून या नेत्यांनी हात दाखवत या सर्व गर्दीला हात दाखवलाय.
-
पाण्याची व्यवस्था सभामंडपात असल्याने बंदी
महायुतीची शिवाजी पार्कात सभा होणार आहे. या सभेसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी काळे वस्त्र परिधान करणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच सोबत पाण्याची बॉटल नेण्यास बंदी असणार आहे. पाण्याची व्यवस्था सभामंडपात असल्याने बाहेरून बॉटलमध्ये पाणी नेण्यास बंदी असल्याची माहिती समोर आली आहे.
-
“जेल का जवाब वोट से” आपच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
महाविकास आघाडीच्या सभेच्या मैदानात आम अदामी पक्षाचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. आपचे कार्यकर्ते हातात पोस्टर घेवून आले आहेत. “जेल का जवाब वोट से , मोदी तेरी गुंडागर्दी नही चलेगी, गली गली मे शोर है नरेंद्र मोदी चोर है”, अशा आशयाचे बॅनर कार्यकर्ते घेऊन आले आहेत.
-
मी अमेठीचा होतो, आहे आणि राहणार : राहुल गांधी
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेठीतील जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, मी 42 वर्षांपूर्वी येथे पहिल्यांदा आलो होतो, जेव्हा मी 12 वर्षांचा होतो. मी राजकारणात जे काही शिकलो ते अमेठीच्या जनतेने मला शिकवले आहे. त्यावेळी रस्ते नव्हते, विकास नव्हता आणि अमेठी आणि माझ्या वडिलांचे नाते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे आणि माझे राजकारणही तेच आहे. मी रायबरेलीतून निवडणूक लढवीत आहे, असे समजू नका, मी अमेठीतूनच होतो, आहे आणि कायम राहणार आहे.
-
पाकव्याप्त काश्मीर भारताचा आहे आणि राहील, आम्ही ते परत घेऊ – अमित शाह
रायबरेलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, हे काँग्रेसवाले, मणिशंकर अय्यर, फारुख अब्दुल्ला म्हणतात की पीओकेबद्दल बोलू नका, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. अरे, कोणाला घाबरवता? 130 कोटी लोकसंख्येच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ज्यांची छाती 56 इंचाची आहे. आज मी राहुल बाबांना सांगतो की तुम्हाला घाबरायचे असेल तर घाबरा, पीओके भारताचा आहे आणि राहील आणि आम्ही ते परत घेऊ.
-
सपाचे लोक तुष्टीकरणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात – पंतप्रधान मोदी
उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सपाचे लोक तुष्टीकरणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. कल्याण सिंह हे देशाचे इतके महान नेते होते, त्यांनी मागासवर्गीयांना एवढा आदर दिला, त्यांचा मृत्यू झाला तेव्हा सपा प्रमुख त्यांना श्रद्धांजली वाहायलाही गेले नाहीत, याचे कारण कल्याण सिंह हे रामभक्त होते, पण उत्तर प्रदेशात जेव्हा माफिया मरतो तेव्हा हे लोक त्याच्या कबरीवर फातिहा वाचायला जातात.
-
तेजस्वी यादव यांनी 1995-2014 दरम्यान किती सरकारी नोकऱ्या दिल्या हे सांगावे: जेडीयू
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जेडीयूने आरजेडी-काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. जेडीयूने म्हटले की, बिहारचा नेता रात्री झोपतानाही रोजगार रोजगार म्हणत राहतो. तेजस्वी एक कोटी नोकऱ्या देण्याचा दावा करतात तर राहुल गांधी 30 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा दावा करतात. तेजस्वी, सांगा 1995-2014 दरम्यान किती सरकारी नोकऱ्या दिल्या? नितीश सरकारमध्ये 2017-2024 मध्ये 9 लाख नोकऱ्या देण्यात आल्या आहेत आणि त्याही कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय.
-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत दाखल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून सुटका झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत दाखल झाले आहेत.
-
भारती पवार यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची सभा
भाजपचे दिंडोरी मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे, गोपीचंद पडळकर यांची आज सभा.
-
कल्याणमध्ये ‘वंचित’च्या कार्यकर्त्याकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण
कल्याणमध्ये ‘वंचित’च्या कार्यकर्त्याकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण. पक्षाची दिशाभूल केल्याच्या गैरसमजातून वंचितच्या कार्यकर्त्याने केली कपडे फाटेपर्यंत मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
-
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागातून मुसळधार पावसाला सुरुवात
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे सुटले आहे. मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. दोन दिवसापासून अवकाळी रिमझिम पाऊस सुरू होता. आज पावसाने चांगलीच बॅटिंग सुरू केली. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आलापल्ली भामरागड, मुलचेरा व गडचिरोली शहरात पावसाला सुरुवात झाली आहे.
-
वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली
आधी उमेदवारी गेली नंतर गैरसमजुतीतून कार्यकर्त्याने दुसऱ्या कार्यकर्त्याला मारहाण केली. कल्याण मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला वंचितच्याच कार्यकर्त्याने मारहाण केली. पक्षाची दिशाभूल केल्याच्या गैरसमजुतीतून वंचितच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचे समोर आले आहे. वंचितचे पदाधिकारी मिलिंद कांबळे यांना मारहाण करण्यात आली आहे.
-
अंबादास दानवे यांचा राज ठाकरेंवर प्रहार
राज ठाकरेंच्या इंजिन मध्ये भाजपचा कोळसा चालू आहे.. ज्या पक्षाचा एक उमेदवार नाही तो गावोगावी आणि घरी जाऊन मतदान मागतोय, अशी शेलकी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. सुपारी घेण्याचे प्रकार किती उच्च स्तराचे असतात हे राज ठाकरेंवरुन दिसत असल्याचा टोला त्यांनी हाणला.
-
दादा भुसे यांचा संजय राऊत यांच्यावर घणाघात
काही महिन्यांपूर्वी वर्षभरापासून दररोचा एक भोंगा मीडिया समोर येतो आणि काहीतरी खोटे नाटे विषय घेऊन या राज्यातील लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करतो, असा घणाघात दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर केला. त्यांचे एक एक विषय जर समोर आले तर त्यांना तोंड दाखवायाला जागा राहणार नाही, असा इशारा पण त्यांनी दिला.
-
अयोध्या पौळ यांचा हल्ला झाल्याचा दावा
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा केला आहे. यामिनी जाधव यांच्या महिला कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असा दावा त्यांनी केला. पौळ या ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक आहेत.
-
जरांगे पाटील दवाखान्यात
मराठा समाजासाठी उपोषण करते म्हणून जरंगे पाटील यांचे अचानक तब्येत खालावल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजी नगर शहरातील गॅलक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मनोज जंगे हे गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली होती त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे इथून पुढे काही दिवस म्हणून जरंगे हे गॅलक्सी रुग्णालयात दाखल असणार आहेत.
-
नितीन गडकरी यांची धुळ्यात प्रचार सभा
केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांची आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरात प्रचार सभा आहे. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी गडकरी यांची सभा होत आहे. यावेळ भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे उपस्थित राहतील.
-
दहावी बारावीच्या निकालाच्या तारखा जाहिर
नुकताच बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारख्या या जाहिर करण्यात आल्या आहेत. बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल आणि दहावीचा निकाल मेच्या चाैथ्या आठवड्यात लागेल.
-
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण चटके
सोयगाव तालुक्यातील सवरखेडा गावात भीषण पाणीटंचाई. गावात पाणी नसल्यामुळे डोंगराच्या झऱ्यातून मिळवावे लागते पाणी. हंडाभर पाण्यासाठी महिलांची डोंगरात पायपीट
-
अमोल कोल्हे यांनी केले मोठे विधान
भुकेलेल्याला जातं आणि धर्म माहित नसते, या गोष्टीकरून आपल्याला विभागले जाते तेव्हा विचार करा, देश राहिला पाहिजे, म्हणून मतदान करायला जातं असतांना, कांद्याला भाव नाही मोदीला मतं नाही, हे लक्षात ठेवा, असे डॉ अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
-
सांगली- कॅफे शॉपमधील अश्लील प्रकाराविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आक्रमक
सांगली- कॅफे शॉपमधील अश्लील प्रकाराविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आक्रमक झाली आहे. सांगलीतील कॅफे शॉपवर हल्लाबोल करत संतप्त शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफे शॉपची तोडफोड करण्यात आली. शहरातील विश्रामबाग 100 फुटी रोडवरील एका कॅफे शॉपमध्ये घुसन त्यांनी तोडफोड केली. काल एका कॅफे शॉपमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध पाजून बलात्काराचा प्रकार घडला आहे.
-
गिरीश महाजन यांनी घेतली छगन भुजबळांची भेट
गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. महाजन यांनी पाया पडून भुजबळांचा आशीर्वाद घेतला. भुजबळ यांनीदेखील गिरीश महाजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला.
-
मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास बंदी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईत चोख बंदोबस्त ठेवला असून सीआरपीसी कलम 144 अंतर्गत आदेश जारी करण्यात आले आहेत. मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास मतदारांना बंदी घालण्यात आली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
-
अंधेरीत 22 मे रोजी 16 तास पाणीपुरवठा बंद
अंधेरी पूर्व इथल्या जुनी नादुरुस्त पाइपलाइन काढून टाकण्याचं काम 22 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून 23 मे रोजी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या दुरुस्तीच्या कामाच्या 16 तासांदरम्यान अंधेरी आणि आसपासच्या विभागांतील पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
-
मध्य रेल्वेवर फलाट विस्तारासाठी 15 दिवसांचा ब्लॉक
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) फलाट क्रमांक 10-11 च्या विस्तारीकरणाचं काम शेवटच्या टप्प्यात आलं असून त्यामुळे लोकस आणि मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल केला आहे. 17 मे शुक्रवारी रात्रीपासून ते 1 जूनपर्यंत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्री सहा तासांचा ब्लॉक असेल.
-
Live Update | घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी ऑक्शन मोडवर…
रत्नागिरी जिल्ह्यातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग हटवा… जिल्हाधिकारी एम.देवेंद्रसिंह यांचे आदेश… घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी ऑक्शन मोडवर…
-
Live Update | बहुजन विकास आघाडीची मोटारसायकलवर रॅली, मोठे शक्तीप्रदर्शन
बहुजन विकास आघाडी आज वसई विरार नालासोपाऱ्या मोटारसायकल रॅली कडून करणार मोठे शक्तीप्रदर्शन… विरार, नालासोपारा, वसई या तिन्ही ठिकाणाहून मोटारसायकल रॅली… सायंकाळी होणार जाहीर सभा
-
Live Update | नागपूर रोडवरील कानपा-बिकली फाट्याजवळ ट्रक आणि ट्रॅव्हलचा भीषण अपघात…
नागपूर रोडवरील कानपा-बिकली फाट्याजवळ ट्रक आणि ट्रॅव्हलचा भीषण अपघात… मात्र सुदैवाने अपघातात 3-4 जणांना किरकोळ दुखापत… सिंदेवाही येथून नागपूरला जात होती लग्नाची वरात तर नागपूर कडून नागभीडच्या दिशेने येत होता ट्रक… धडक दिल्याने ट्रॅव्हलचं मोठं नुकसान….
-
अहमदनगर – शेतकऱ्यांनी नगर मनमाड महामार्ग अडवला
राहुरी / अहमदनगर – शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरात महामार्ग अडवला. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला आवर्तन सोडण्याची मागणी. पाण्याअभावी पिके करपण्याची भीती. शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन, कडक उन्हात शेतकरी उतरले रस्त्यावर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असून आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
-
भिवंडी लोकसभेतील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांची जाहीर सभा
भिवंडी लोकसभेतील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांची जाहीर सभा. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर व प्रहार संघटनेचे बच्चू कडू सभेसाठी उपस्थित राहणार. कल्याण पश्चिम परिसरातील फडके मैदानात आज सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे आणि भाजप केंद्रीय मात्र कपिल पाटील याच्या विरोधात भिवंडी लोकसभेत सांबरे हे अपक्ष निवडणूक लढवत आहे
-
मोदी घाबरले आहेत त्यामुळेच ते महाराष्ट्राचे दौरे करत आहेत – नाना पटोले
मोदी घाबरले आहेत त्यामुळेच ते महाराष्ट्राचे दौरे करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
राज ठाकरे स्वतःच हद्दपार झालेत ते काँग्रेसला हद्दपार करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. भाजपला फक्त 180 जागा मिळतील असा दावा पटोले यांनी केला.
-
लोकसभा निवडणुकीनंतर काहींची दुकानं बंद होतील – संजय राऊत
या लोकसभा निवडणुकीनंतर काही सुपारीची दुकानं बंद होतील, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता लगावला.
-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज मुंबई दौरा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज मुंबई दौरा. केजरीवाल यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर ते पहिल्यांदा मुंबईत येणार आहेत. दुपारी 4 वाजता मुंबई विमानतळावर त्यांचं आगमन होईल. त्यानंतर केजरीवाल हे मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. या भेटीनंतर केजरीवाल आणि उद्धव ठाकरे एकत्र BKC येथील सभेला पोहचतील
-
पुणे विमानतळावर एअर इंडियाच्या विमानास ‘पुश बॅक टग’ची धडक, मोठे नुकसान
पुणे – पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला ‘पुश बॅक टग’ (विमान ओढणे किंवा ढकलण्याचे वाहन) वाहनाची धडक बसल्याने मोठे नुकसान झाले. या धडकेत विमानाच्या खालच्या बाजूस असलेल्या ‘फ्युजलाज’ला मोठे भगदाड पडले, तसेच विमानाच्या पुढच्या टायरचे आणि पंखाच्या पत्र्याचेदेखील नुकसान झाले.
त्यामुळे एअर इंडियाला हे उड्डाण रद्द करावे लागले. या अपघातामुळे प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाली.
-
Marathi News : EVM वरील CCTV चा डिस्प्ले २४ तास बंद
शिरूर मतदारसंघाच्या स्ट्राँगरुममधील धक्कादायक प्रकार घडला आहे. ईव्हीएमवरील CCTV चा डिस्प्ले २४ तास बंद होता. बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रकारानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातही सीसीटीव्ही डिस्प्ले बंद असल्याची घटना घडली आहे. 24 तास हे सीसीटीव्ही डिस्प्ले बंद होते. हा सगळा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सीसीटीव्ही डिस्प्ले सुरू केले.
-
Marathi News : मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा किरण सानप शरद पवारांच्या भेटीला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा किरण सानप शरद पवारांच्या भेटीला आला आहे. सानप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा पदाधिकारी आहे. पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घातल्या प्रकरणी त्याला अटक झाली होती. जामीन मिळताच तो शरद पवारांच्या भेटीला आला आहे.
-
Marathi News : महावितरणच्या सब स्टेशनला भीषण आग
छत्रपती संभाजी नगरमधील कन्नड तालुक्यातील औराळा येथील महावितरणच्या सब स्टेशनला भीषण आग लागली. मुख्य प्रवाह करणाऱ्या विजेच्या साहित्याला लागलेली ही भीषण आग पाहताच परिसरात घबराहट निर्माण झाली.
-
Marathi News : सारथी संकेतस्थळ पुन्हा बंद
पिंपरी चिंचवड परिवहन विभागाचे सारथी संकेतस्थळ पुन्हा बंद पडले आहे. आता देखभाल दुरुस्तीसाठी १८ मे पर्यंत संकेतस्थळ बंद राहणार आहे. ही सेवा बंद असल्याने शिकाऊ आणि पक्का वाहन परवाना काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
-
Maharashtra News : मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा शरद पवारांच्या भेटीला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा किरण सानप शरद पवारांच्या भेटीला. किरण सानप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा पदाधिकारी. पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घातल्या प्रकरणी किरण सानपला झाली होती अटक. जामीन मिळताच किरण सानप शरद पवारांच्या भेटीला.
-
Maharashtra News : मुंबईकडे जाणारा 700 पोते तांदूळ पोलिसांच्या ताब्यात
बार्शीतून मुंबईकडे जाणारा 700 पोते संशयास्पद तांदूळ बार्शी तालुका पोलिसांनी ताब्यात घेतला. एका ट्रकमधून मुंबईकडे जाणारा हा तांदूळ खासगी आहे की शासकीय याचा तपास पोलीस करत आहेत. मागील काही दिवसात शासकीय तांदळाची खासगी विक्रेत्याला विक्री होत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
-
Maharashtra News : शिरुरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातही CCTV डिस्प्ले बंद
शिरूर मतदारसंघाच्या स्ट्रॉंगरुममधील धक्कादायक प्रकार. बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रकारानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातही सीसीटीव्ही डिस्प्ले बंद असल्याची घटना घडली आहे. 24 तास हे सीसीटीव्ही डिस्प्ले बंद होते. हा सगळा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सीसीटीव्ही डिस्प्ले सुरू केले.
-
PM Modi-Raj Thackeray rally : मोदी-राज सभेमुळे मुंबईच्या वाहतुकीत आज काय बदल?
राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शुक्रवारी दादरमधील अनेक रस्ते गरजेनुसार वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. सावरकर मार्ग, केळुस्कर रोड, केळकर मार्ग या रस्त्यावर पार्किंग करता येणार नाही. सभेसाठी येणाऱ्या वाहनांसाठी देखील विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
दादर आणि माटुंगा परिसरातील तब्बल ३० ठिकाणी नो पार्किंग झोन ठेवण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत दादर आणि माटुंगा परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवाजी पार्कच्या संपूर्ण परिसरात आज सकाळी १० च्या नंतर झिरो पार्किंग करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा व्यवस्था पाहून हा सगळा वाहतुकीच्या बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Published On - May 17,2024 8:26 AM