‘कधी पवारांची जिरवतोय याची लोकं वाट बघतायत’, विजय शिवतारेंचं वक्तव्य
शिवसेना नेते विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. पण महायुतीत ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. पण असं असतानाही शिवसेना नेते विजय शिवतारे हे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली याबाबतची भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढली. पण तरीही ते आपल्या मतावर ठाम आहेत. याउलट ते पवारांच्या विरोधात आक्रमकपणे बोलत आहेत.
“प्रस्थापित विघातक शक्ती म्हणजेच पवार कुटुंबाला बाजूला सारून सर्वसामान्यांची सत्ता आणण्यासाठी अतिशय भव्यदिव्य विजय आमच्या पदरात टाक, अशी प्रार्थना देवाला केली”, असं विजय शिवतारे म्हणाले. “अजित पवारांनी आत्तापर्यंत कायं केलं हे सर्वांना माहिती आहे. त्याचा राग सर्वसामान्यांच्या मनात आहेच. मी त्यांना माफ केलं आहे. नियती त्यांना माफ करणार नाही. 50 वर्ष, 3-3 पिढ्या पवारांना का खासदार करावं? याविरोधात माझी लढाई आहे. लोकसभा मतदारसंघ ही कुणाची प्रॉपर्टी, कोणाचा सातबारा नाही. हा देशातला एक मतदारसंघ आहे. पुन्हा-पुन्हा पवारांना मतदान करण्यापेक्षा या ठिकाणी नवीन चेहरा आला पाहिजे. हे पवार बाजूला गेले पाहिजेत. लोकांना आता ते नको आहेत. दोन्ही पवारांच्या विरोधात जनसामान्यांचा आवाज म्हणून मी या ठिकाणी उभा आहे”, अशी भूमिका विजय शिवतारे यांनी मांडली.
शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करुन घड्याळ चिन्हावर शिरुरची जागा लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत विजय शिवतारे यांना प्रश्न विचारला असता, “तिथे आढळराव आहेत. ते घड्याळवर लढतील, नाहीतर कशावरही लढतील. इथे लढाई वेगळी आहे इथे सुप्रियाताई आहेत. इथली लढाई पवारांना बाजूला करण्याची आहे. मग सुप्रियाताई काय किंवा सुनेत्राताई काय शेवटी पवारच. म्हणून इथे लढाई तशी होणार नाही, इथली लढाई पवार वर्सेस सामान्य जनता अशी आहे. त्याचं प्रतिनिधित्व मी करत आहे. म्हणून तिथे शक्य झालं ते इथे शक्य नाही. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की ही सीट आपण सहज जिंकू शकतो. सर्वसामान्य जनता प्रचंड संख्येने आपल्यासोबत आहे. हिस्टॉरिक विजय हा धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढूनही या ठिकाणी होऊ शकतो”, असं मत शिवतारे यांनी मांडलं.
‘कुठल्याही परिस्थितीत पवारांशी कॉम्प्रमाईज नाही’
“आढळरावांना आज इलेक्टिव्ह मेरिट आहे. पण शिवसेनेऐवजी सीटिंग सीट म्हणून ती घड्याळाची आहे. म्हणून आढळरावांना सेनेमधून राष्ट्रवादीत पाठवलं गेलं. असे अनेक कॉम्प्रमाईज आज होत आहेत. पण तशी ही जागा कुठल्याही परिस्थितीत आम्ही पवारांशी कॉम्प्रमाईज करणार नाही”, अशी भूमिका शिवतारे यांनी मांडली.
‘कशासाठी तुम्ही अजित पवारांना सोबत घेतलं?’
“कशासाठी तुम्ही अजित पवारांना या ठिकाणी घेतलेलं आहे, तुमचा हेतू काय आहे? तुमचा हेतू पवारांना रोखणं असेल, तर हे दुसरे जुनियर पवार त्यांच्यापेक्षाही वाईट आहेत. त्यांना सोबत घेऊन तुम्ही आमच्या बोकांडी पुन्हा ब्रह्मराक्षस बसवत असाल, तर ते योग्य नाही”, असा सल्ला विजय शिवतारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला
कमळ चिन्हावर लढण्याबाबत काही चर्चा झाली आहे का?
यावेळी विजय शिवतारेंना कमळ चिन्हावर लढण्याबाबत काही चर्चा झाली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “मी याबाबत आमच्या नेत्यांशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. आमचे मतभेद असू शकतात, मनभेद नाहीत. माझे मतभेद आहेत. या ठिकाणी लढलं पाहिजे, म्हणून त्यासाठी तात्पुरता मी बाजूला जरी झालो तरी काय फरक पडत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कायं बोलणं झालंय हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी काय बोलणार? पण देवेंद्र फडणवीस यांनी बोललं म्हणून इथल्या लोकांचा रोष थांबेल असं वाटत नाही”, अशी भूमिका विजय शिवतारे यांनी मांडली.
“कुणासाठी कायं बोलले हे महत्वाचं नाही. अशा प्रकारची भाषा राजकारणात चालते का? विधानसभेच्या शेवटच्या प्रचारात अजित पवार काय बोलले? ॲम्बुलन्समध्ये मी प्रचार करत होतो, नऊ स्टेन टाकलेल्या होत्या. अडचणीत होतो. किडनी गेली होती आणि हे बोलले मरायला टेकलेले आहात तर कशाला निवडणुका लढवता? एवढी घाणेरडी भाषा.. मी कुणाला माहिती नाही.. प्रचारादरम्यान मी ही प्रसिद्ध करणार आहे”, असं विजय शिवतारे म्हणाले.
‘कधी पवारांची जिरवतोय याची लोकं वाट बघतायत’
“एखादी उपमा कोणाला दिली तर ती अश्लाघ्य भाषा कुठली? कुणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेब बोलले, लोकशाही आहे कुणीही काहीही बोलेल. त्याच्याबद्दल रिएक्शन होऊ शकतात. पण अशा प्रकारचं वागणं बरोबर नाही. शरद पवारांवर टीका झाली म्हणून मी असं बोललो असे फक्त ते आता नाव करत आहेत. लोकं वाट बघत आहेत. कधी एकदा इलेक्शन होतंय आणि कधी एकदा अजित पवार आणि शरद पवार यांची जिरवतोय याची लोकं वाट बघतायत”, असं विजय शिवतारे म्हणाले.
‘कशाला ब्लॅकमेलिंग करता?’
अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी विजय शिवतारे यांच्यावर टीका करताना जे गरजतात ते पडत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर विजय शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलं. “जे गरजतात ते बरसतात का बोलले ना? मग कशाला झ* मारायला ते एवढे बोलतायत? इकडे माणसं उभे करतो. तिकडे उभे करतो. कशाला ब्लॅकमेलिंग करता? बोलू नका ना. खेळाडू वृत्तीने लढा ना. सगळं त्यांना माहिती आहे. काय होईल येही माहिती आहे. एक तर मी जिंकेन नाहीतर अजित पवारांचा खात्मा होईल”, असं विजय शिवतारे म्हणाले.