सरकार स्थापनेसाठी काँग्रेसवर कोणाचा दबाव? मोदींना घेरण्यासाठी इंडिया आघाडीचा प्लान काय?
केंद्रातल्या सत्ता स्थापनेत किंग मेकर ठरणारे जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेण्यासाठी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल काल जाहीर झाले.
लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल काल जाहीर झाले. देशातील जनतेने आपला कौल दिला आहे. कुठल्याही एकापक्षाला स्पष्ट बहुमत दिलेलं नाही. पण भाजपाप्रणीत NDA कडे बहुमताच्या मॅजिक फिगरपेक्षा जास्त जागा आहेत. केंद्रात सत्ता स्थापनेसाठी 272 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. भाजपाप्रणीत एनडीकडे 292 खासदार आहेत. तेच काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीकडे 234 खासदार आहेत. म्हणजे बहुमताच्या आकड्यापासून इंडिया आघाडी दूर आहे. मात्र, तरीही इंडिया आघाडीतील नेते सत्ता स्थापनेचा दावा करत आहेत. केंद्रातल्या सत्ता स्थापनेत किंग मेकर ठरणारे जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेण्यासाठी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान दुसऱ्याबाजूला काँग्रेस सरकार स्थापनेची खात्री असेल, तरच पुढच पाऊल उचलणार आहे. काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्यापासून काही अडचण नाहीय. पण घटक पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी दबाव टाकत आहेत. मोदी सरकारने जे निर्णय घेतले, ते बदलायचे आणि त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना चौकशीच्या फेऱ्यात आणून घेरायच ही इंडिया आघाडीची रणनिती आहे. इंडिया आघाडीकडून शरद पवार यांच्यावर नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इंडिया आघाडी ही नितीश कुमार यांचीच संकल्पना होती. दुसऱ्याबाजूला तेलंगणचे मुख्यमंत्री रेवन्त रेड्डी यांच्यावर टीडीपीच्या चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी आहे. दोन्ही नेत्यांमध्ये चांगले, मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
तीन राज्यांनी भाजपाचा खेळ बिघडवला
भाजपाने यावेळी 400 पारचा नारा दिला होता. पण प्रत्यक्षात यावेळी भाजपाची घोडदौड 240 वर थांबली. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या तीन राज्यांमुळे भाजपाला पूर्ण बहुमत मिळू शकलं नाही. उत्तर प्रदेशात भाजपाच्या जागा 62 वरुन 33 वर आल्या. म्हणजे 30 जागांचा फटका बसला. महाराष्ट्रात 41-42 वर असणारी महायुती 17 पर्यंत घसरली. राजस्थानात 25 पैकी 11 जागांवर भाजपाच नुकसान झालं. त्यामुळे स्वबळावर बहुमताचा मॅजिक फिगर गाठता आला नाही.