2024 मध्ये मोदी सरकारकडे काय असेल गेमचेंजर मुद्दा? पाहा सर्व्हे काय म्हणतोय?
मोदी सरकार 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी गेमप्लान तयार झाला आहे. भाजपने आतापासूनच कामाला सुरुवात देखील केली आहे. सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपकडे कोणता सर्वात मोठा मुद्दा असेल याबाबत आता राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडे सर्वात मोठा मुद्दा असेल तो म्हणजे राममंदिराचा. आज देशात लोकसभा निवडणुका झाल्या तर काय परिस्थिती असेल. याबाबत एका सर्व्हेमध्ये काय पुढे आलंय. पाहुयात.
नवी दिल्ली : 2024 मध्ये देशात लोकसभा निवडणुका ( Loksabha Election 2024 ) होणार आहेत. यासाठी भाजपने निश्चितच तयारी सुरु केली आहे. याबाबत प्रत्येक मतदारसंघात भाजपकडून ( BJP ) चाचपणी सुरु झाली आहे. पण जर आता देशात सार्वत्रिक निवडणुका (लोकसभा निवडणूक २०२४) झाल्या तर काय परिस्थिती असेल याबाबत एक सर्व्हे करण्यात आला. लोकसभा निवडणुकीतील मुद्दे काय असतील याबद्दल TV-9 ने सर्व्हे केलाय. या सर्वेक्षणानुसार, आज देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या तर राम मंदिर आणि हिंदुत्व हा सर्वात मोठा मुद्दा असेल. सर्वेक्षणात लोकांनी राममंदिराचा फायदा भाजपला मिळणार असल्याचे म्हटले आहे.
सर्वेक्षणानुसार, 72.6 टक्के लोकांचे मत आहे की, राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला फायदा होईल. तर 19.1 टक्के लोकांनी राम मंदिराच्या उभारणीचा फायदा भाजपला मिळेल असे वाटत नसल्याचे म्हटले आहे. तर 8.3 टक्के लोकांना याबाबत निश्चित उत्तर देता आले नाही. सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीत राम मंदिराच्या उभारणीचा फायदा भाजपला मिळणार आहे.
गेमचेंजर मुद्दा?
2024 साठी कोणते मुद्दे भाजपसाठी गेम चेंजर ठरू शकतात याबद्दल बोलायचं झाले तर सर्वेक्षणानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदुत्व हा सर्वात मोठा मुद्दा असणार आहे. 23.9 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की हिंदुत्वाचा मुद्दा भाजपसाठी गेम चेंजर ठरू शकतो. 20.9 टक्के लोकांनी हे मान्य केले आहे की राम मंदिराचा मुद्दा देखील सत्ताधारी पक्षासाठी गेम चेंजर असेल.
सर्वेक्षणात केंद्रातील भाजप सरकारच्या विकासाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ज्याबद्दल 17.9 टक्के लोकांनी सांगितले की, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत विकास हा मोठा मुद्दा असेल आणि भाजपसाठी हा गेम चेंजर मुद्दा असेल. 11.5 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की भाजपची हिंदुत्व प्रतिमा फायदेशीर ठरू शकते.
मोदींना किती टक्के लोकांची पसंती?
सर्वेक्षणात समाविष्ट लोकांपैकी 72.6 टक्के लोकांनी पीएम मोदींच्या आतापर्यंतच्या कामावर आनंद व्यक्त केला आहे. तर 23.5 टक्के लोक नाखूष दिसले. त्याच वेळी, 3.9 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना अद्याप याबाबत काही सांगता येणार नाही. सर्वेक्षणात 58 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला आवडता उमेदवार असल्याचं देखील म्हटलं आहे.
मेघालय, त्रिपुरा, नागालँडचा निकाल
आजच या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. ज्यामध्ये त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेत येताना दिसत आहे. मेघालयमध्ये अजून स्थिती स्पष्ट झालेली नाही. या भागात ही भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा अजून कायम असलेला दिसत आहे.