Naresh Mhaske : तळागाळातून वर आलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राइट हँड नरेश म्हस्के कोण?
Naresh Mhaske : 20 मे रोजी मतदान झालं. त्यानंतर राजन विचारे यांच्याबाजूने हवा असल्याच चित्र निर्माण झालं होतं. ते पुन्हा एकदा ठाण्याचे खासदार होणार, असा बहुतांश एक्झिट पोल्सचा अंदाज होता. पण निकालाच्या दिवशी उलट चित्र दिसलं.
लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालात काल ठाण्याच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. ठाण्याची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय होता. कारण ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होम पीच आहे. ठाण्याचा निकाल विरोधात गेला असता, तर विरोधकांनी रान उठवलं असतं. ठाण्यातून शिवसेना ठाकरे गटाने विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी दिली होती. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत असताना बंड पुकारलं. त्यावेळी 40 आमदारांसह ठाण्यातील सर्वच नेत्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. अपवाद फक्त खासदार राजन विचारे यांचा. ते ठाकरे गटामध्येच राहिले. त्यांचा सामना नरेश म्हस्के यांच्याशी होता. ठाण्यातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली होती.
20 मे रोजी मतदान झालं. त्यानंतर राजन विचारे यांच्याबाजूने हवा असल्याच चित्र निर्माण झालं होतं. ते पुन्हा एकदा ठाण्याचे खासदार होणार, असा बहुतांश एक्झिट पोल्सचा अंदाज होता. पण निकालाच्या दिवशी उलट चित्र दिसलं. नरेश म्हस्के हे थोड्या थोडक्या नव्हे, तब्बल 2 लाखापेक्षा जास्त मताधिक्क्य घेऊन दणदणीत विजय मिळवला. राजन विचारे जिंकणार ही फक्त हवाच ठरली. प्रत्यक्षात बाजी नरेश म्हस्के यांनी मारली.
कोण आहेत नरेश म्हस्के?
नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील सर्वात विश्वासू सहकारी आहेत. नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राइट हँड मानले जातात. नरेश म्हस्के यांनी मागच्या 12 वर्षात नगरसेवक ते खासदार असा प्रवास केला आहे. 2012 साली नरेश म्हस्के पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ठाणे महापालिकेवर निवडून गेले. त्यांच्या कामाची पद्धत पाहून 2017 मध्ये त्यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं. ते पुन्हा नगरसेवक बनले.
नेहमीच शिंदेंसोबत सावलीसारखे
नगरसेवक पदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये ते ठाणे महापालिकेत सभागृह नेते बनले. त्यानंतर 2019 ते 2022 अशी तीन वर्ष ते ठाणे महापालिकेचे महापौर होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ते नेहमीच शिंदेंसोबत सावलीसारखे दिसले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर नरेश म्हस्के यांच्यावर शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याशिवाय त्यांना पक्षाच प्रवक्ता बनवण्यात आलं. आता ते ठाण्याचे खासदार म्हणून लोकसभेवर जाणार आहेत.