सर्वाधिक गुन्हे असलेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ पक्षाचा खासदार अव्वल, किती गुन्हे?
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. देशाच्या संसदेत 543 खासदार बसणार आहेत. यातील अनेक खासदार उच्च विद्याविभूषित आहेत. काही गर्भ श्रीमंत आहेत. काही कर्जबाजीरा आहेत. तर काहींवर गंभीर गुन्हे आहेत. यंदाच्या लोकसभेत जसे सर्वात तरुण खासदार निवडून आले आहेत, तसेच सर्वात बुजुर्ग खासदारही दिसणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपने 240 जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीचे 234 खासदार तर इतर 16 खासदार निवडून आले आहेत. मात्र, देशात एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. देशातील नवनिर्वाचित खासदारांमध्ये काही खासदार सर्वाधिक श्रीमंत आहेत. तर काही सर्वाधिक गरीब. काही कर्जबाजारी आहेत. तर काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. काही ज्येष्ठ आहेत तर काही सर्वात तरुण आहेत. जनतेनेच या सर्वांना संसदेत निवडून पाठवलं आहे.
18 व्या लोकसभेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचेही खासदार निवडून आले आहेत. यात महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्यावर सर्वाधिक गुन्हे आहेत. धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाचे खासदार आहेत. त्यांच्या विरोधात 157 गंभीर आयपीसी आणि 36 क्रिमिनल केसेस दाखल आहेत. यात दुसऱ्या नंबरवर आहेत भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद पहिल्यांदाच खासदार बनले आहेत. ते उत्तर प्रदेशातील नगीना मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्यावर 80 गंभीर गुन्हे आहेत. तर 36 क्रिमिनल केसेस आहेत. या क्रमवारीत तिसऱ्या नंबरवर आहेत बिहारच्या पूर्णिया लोकसभा मतदारसंघातील खासदार पप्पू यादव. पप्पू यादव यांच्यावर 42 गंभीर आणि 41 क्रिमिनल केसेस आहेत.
श्रीमंत खासदार कोण?
आंध्रप्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातील टीडीपी खासदार डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी हे देशातील सर्वात श्रीमंत खासदार आहेत. त्यांची नेटवर्थ सुमारे 5705 कोटी रुपये आहे. दुसऱ्या नंबरवर भाजपचे तेलंगनाच्या चेवेला मतदारसंघातील कोंडा विश्वेश्वर रेड्डी हे आहेत. त्यांची नेटवर्थ सुमारे 4568 कोटी आहे. तिसऱ्या नंबरवर भाजपचे खासदार नवीन जिंदल आहेत. जिंदल हे हरियाणाच्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांची नेटवर्थ तब्बल 1241 कोटी एवढी आहे.
देशातील या श्रीमंत खासदारांवर कर्जही आहे. टीडीपीचे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी यांच्यावर 1038 कोटीचं कर्ज आहे. तर डीएमके नेता एस जगत्राचकन यांच्यावर 649 कोटींचं कर्ज आहे. जनत्राचकन हे तामिळनाडूच्या अरक्कोनम लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. वर्षभरात सर्वाधिक कमाई करणारे खासदारही संसदेत पोहोचले आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातच या खासदारांनी ही माहिती दिली आहे. भाजपचे खासदार नवीन जिंदल यांना वर्षभरात 74 कोटी रुपयांची कमाई झाली होती.
सर्वात तरुण कोण?
देशाच्या नव्या संसदेत सर्वात तरुण खासदारही पोहोचले आहेत. विशेष म्हणजे वयाच्या 25 व्या वर्षीच या खासदारांना संसदेत येता आलं आहे. बिहारच्या समस्तीपूर लोकसभा मतदार संघातील खासदार शाम्भवी या सर्वात तरुण खासदार ठरल्या आहेत. शाम्भवी या एलजेपी रामविलास पार्टीच्या खासदार आहेत. यूपीच्या कौशाम्बी लोकसभा मतदारसंघातून पुष्पेंद्र सरोज आणि मछलीशहर मतदारसंघातून निवडून आलेल्या प्रिया सरोज सुद्धा तरुण खासदार ठरले आहेत. हे दोन्ही खासदार समाजवादी पार्टीचे आहेत. नव्या लोकसभेत बुजुर्ग खासदारही आहेत. तामिळनाडूच्या श्रीपेरंबदूर लोकसभा मतदारसंघातील डीएमकेचे खासदार टीआर बालू हे सर्वात ज्येष्ठ खासदार आहेत. बालू यांचं वय 82 एवढं आहे.