मोदी सरकार कधीही येऊ शकतं धोक्यात, जाणून घ्या काय आहे कारण
भाजपला यंदा लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्याने इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे. भाजपला आता एनडीएमधील पक्षांना देखील महत्त्व द्यावे लागणार आहे. कारण त्यांच्याच पाठिंब्यावर सरकार सत्तेत राहणार आहे. असं असलं तरी मोदी सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं. काय आहे कारण समजून घ्या.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना एनडीएच्या (NDA) मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करावे लागणार आहे. मोदींनी यंदा एनडीएसाठी 400 पार करण्याचा नारा दिला होता. मात्र, भाजपला केवळ 240 जागा तर एनडीएला २९२ जागा मिळाल्या. ५४३ जागांच्या लोकसभेत भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिला. एनडीए आघाडीला बहुमत मिळाले असले तर यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पक्षांमध्ये टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे नाव देखील महत्त्वाचे आहे. भाजपनंतर सत्ताधारी एनडीएमध्ये टीडीपी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तो सध्या ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत 16 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर जेडीयू (JDU) आहे, ज्याला 12 जागा मिळाल्या आहेत.
दोन्ही पक्षांवर अवलंबून राहावे लागणार
जागांचे समीकरण पाहिल्यास एनडीएचे सरकार स्थापनेसाठी भाजपला टीडीपी तसेच जेडीयू या दोन्ही पक्षांवर अवलंबून राहावे लागेल. पण आता प्रश्न असा आहे की, चंद्राबाबू नायडू यांच्यावर विश्वास ठेवता येईल का? इतिहास पाहिला तर असे लक्षात येईल की नायडू यांनी यापूर्वीही फसवणूक केली आहे. त्यामुळे भाजप त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवेले असं वाटत नाही.
चंद्राबाबू नायडू ( Chandrababu Naidu ) यांना इंडिया अलायन्सकडूनही ऑफर येत असल्याची चर्चा आहे. मात्र, टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आम्ही एनडीएमध्ये असून मी बैठकीसाठी दिल्लीला जात असल्याचे जाहीर केले आहे. चंद्राबाबू नायडूंच्या या घोषणेने भाजपने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल.
आंध्र प्रदेशच्या विशेष दर्जा मिळावा या मागणीसाठी चंद्राबाबू नायडू यांनी मार्च 2018 मध्ये NDA शी संबंध तोडले होते. पण त्यांच्या या निर्णयाचा त्यांना 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला.
चंद्राबाबू नायडू सहा वर्षांनंतर पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले. आंध्र प्रदेशात भाजप आणि जनसेनासोबत युती करून विधानसभा निवडणूक लढवली. युतीमध्ये त्यांनी राज्यातील एकूण 175 विधानसभा जागांपैकी टीडीपीने 144, जनसेनेने 21 आणि भाजपने 10 जागा लढवल्या. राज्यात भाजपसोबत युती असूनही नायडू यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगळी भूमिका घेत मुस्लीम आरक्षणाचा पुरस्कार केला. मुस्लिमांच्या चार टक्के आरक्षणाला आम्ही सुरुवातीपासून पाठिंबा देत आलो आहोत आणि यापुढेही राहणार असल्याचे त्यांनी उघडपणे सांगितले. पण टीडीपीने आपल्या जाहीरनाम्यात या मुद्द्यापासून स्वतःला दूर केले आहे.
पीएम मोदींचे कौतुक पण…
एनडीएमध्ये परतल्यानंतर चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करताना दिसले. 2002 मध्ये गुजरात दंगलीनंतर नायडू यांनी मोदींना विरोध केला होता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून नायडू यांच्या नावावरही अनेक विक्रम आहेत. ते सर्वाधिक काळ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी 13 वर्षे 247 दिवस अनेक टर्म मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. याशिवाय ते आंध्र प्रदेशचे एकमेव नेते आहेत ज्यांनी आंध्रपासून वेगळे होऊन तेलंगणाच्या निर्मितीनंतर राज्याची सूत्रे हाती घेतली.
नायडू यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष
चंद्राबाबू नायडू यांचा राष्ट्रीय राजकारणातही मोठा प्रभाव आहे. 1996 आणि 1998 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी संयुक्त आघाडीचे नेतृत्व केले. 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारला पाठिंबा देण्यापूर्वी ते संयुक्त आघाडीचे निमंत्रक होते. चंद्राबाबू नायडू एनडीएमध्ये सामील झाले तेव्हा ते त्याचे निमंत्रकही होते. त्यांचा राजकीय प्रवास 1970 च्या दशकात सुरू झाला. ते युवक काँग्रेसमध्येही होते. नंतर ते आंध्र प्रदेशातील प्रादेशिक पक्ष तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) मध्ये गेले. आता नव्या राजकीय परिस्थितीत ते केंद्रातील एनडीए सरकारमध्ये किंगमेकर म्हणून उदयास आले आहेत. त्याची पुढील वाटचाल काय असेल हे पाहणे उत्सूकतेचे ठरेल.