’70 वर्षात आदिवासींना विचारलं नाही, आज आदिवासींनी काँग्रेसला पाडलं’; नरेंद्र मोदी यांनी टोचले कान
"देशातील आदिवासी समाजही आपलं मत उघडपणे मांडत आहे. आदिवासी समाज काँग्रेसच्या धोरणामुळे सात दशके मागे राहिला. त्यांना संधी दिली नाही. त्यांची लोकसंख्या दहा कोटी आहे. गुजरात निवडणुकीत आम्ही पाहिलं, ज्या काँग्रेसने कधी आदिवासींना विचारलं नाही त्यांनी काँग्रेसचा सफाया केला", अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : देशातील तीन राज्यांमध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मतदारांचे आभार मानले. मोदींनी यावेळी आपल्या भाषणात आदिवासी समाजाचा देखील उल्लेख केला. “देशातील आदिवासी समाजही आपलं मत उघडपणे मांडत आहे. आदिवासी समाज काँग्रेसच्या धोरणामुळे सात दशके मागे राहिला. त्यांना संधी दिली नाही. त्यांची लोकसंख्या दहा कोटी आहे. गुजरात निवडणुकीत आम्ही पाहिलं, ज्या काँग्रेसने कधी आदिवासींना विचारलं नाही त्यांनी काँग्रेसचा सफाया केला”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. “हीच भावना आम्ही एमपी, छत्तीसगड आणि राजस्थानातही पाहिली. या राज्यातील आदिवासींच्या जागेवर काँग्रेसचा सुफडा साफ झाला आहे”, असा दावा मोदींनी आपल्या भाषणात केला.
“आदिवासी समाज आज विकासासाठी आशावादी आहे. ही आशा केवळ आणि केवळ भाजप सरकारच पूर्ण करू शकते. हे त्यांना माहीत आहे. मी प्रत्येक राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्याचं कौतुक करतो. पूर्ण प्रशंसा करतो. भाजप आणि कमळाबाबतची तुमची निष्ठा, तुमचं समर्पण अतुलनीय आहे. डबल इंजिन सरकारचा मेसेज तुम्ही प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवला. त्याचा फायदा आज होत आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदींकडून आदिवासी आणि ओबीसी समाजाचा उल्लेख
“मी वारंवार सांगत आहे. माझ्यासाठी देशात चार जातीच सर्वात मोठ्या जाती आहेत. नारीशक्ती, युवा शक्ती , शेतकरी आणि गरीब कुटुंब या चारच जाती आहेत. आपले ओबीसी साथी याच वर्गातून येतात. आज मोठ्या संख्येने आदिवासी लोक याच वर्गातून येतात. या निवडणुकीत चारही जातींनी भाजपच्या योजना आणि रोडमॅपवर उत्साह दाखवला आहे. आज प्रत्येक गरीब म्हणतोय, तो स्वत: जिंकला आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“प्रत्येक वंचितला वाटतं आपणच जिंकलोय. प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं ही निवडणूक शेतकरी जिंकले आहेत. आज आदिवासींना वाटतं आपण ज्याला मत दिलं त्यांचा विजय झाला. प्रथम मतदारांनाही आपल्यामुळेच विजय झाल्याचं वाटतं. प्रत्येक महिललेला आपणच विजयी झाल्याचं वाटतं. प्रत्येक नागरिक हे आपलं यश मानतो. जो २०४७ भारताला विकसित राष्ट्र पाहू इच्छितो”, असं मोदी म्हणाले.
‘नारी शक्तीचं अभिनंदन करतो’
“मी देशातील नारी शक्तीचं अभिनंदन करतो. रॅलीत मी सातत्याने सांगायचो. या निवडणुकीत महिला शक्ती भाजपला विजयी करणार असल्याचा निश्चय केल्याचं सांगायचो. देशातील नारी शक्ती जेव्हा ज्याचं सुरक्षा कवच बनते, तेव्हा कोणतीही ताकद त्यांना रोखू शकत नाही. नारीशक्ती वंदन अधिनियमाने महिलांच्या मनात नवा विश्वास जागवला आहे. देशातील प्रत्येक महिलेच्या मनात भरवसा निर्माण झाला आहे. भाजप सरकारमध्ये त्याची भागिदारी उंचवणार आहे, असं या महिलांना वाटतं. भाजपच महिलांचा सन्मान करू शकते असं प्रत्येक कन्येला वाटतं”, असं मोदी म्हणाले.
“गेल्या दहा वर्षात भाजपने त्यांच्यापर्यंत टॉयलेट, वीज, गॅस, पाणी, बँकेत खाती अशा सुविधा दिल्या. इमानदारीने काम केलं. भाजप कुटुंब, समाजात त्यांची आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी रोजगाराच्या संधी वाडवण्यासाठी निरंतर काम करत आहे, हे महिला पाहत आहे. नारी शक्तीचा विकास हा भाजपच्या विकास मॉडेलचा स्तंभ आहे. म्हणूनच या निवडणुकीत महिलांनी भाजपाच्या विजयाची जबाबदारी आपल्या हातात घेतली होती. आपल्याला भरपूर आशीर्वाद दिला. मी नम्रपणे देशातील महिलांना हेच सांगेल की तुम्हाला जी आश्वासनं दिली ती शत प्रतिशत पूर्ण करू. ही मोदींची गॅरंटी आहे. आणि मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.