Goa Government Formation: सावंत आले तरी राणे दिल्लीतच, गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम?
गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले आहेत. भाजपला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र अजूनही गोव्यातील मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला दिसत नाहीये.
पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले आहेत. भाजपला (bjp) या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र अजूनही गोव्यातील (Goa Government) मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटलेला दिसत नाहीये. गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत (pramod sawant) आणि भाजप नेते विश्वजित राणे दिल्लीत गेले होते. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चाही केल्या. त्यानंतर प्रमोद सावंत दिल्लीहून गोव्यात आले. मात्र, विश्वजित राणे अजूनही दिल्लीतच आहेत. राणे दिल्लीतच थांबल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अजूनही कायम असल्याचे संकेतही या निमित्ताने मिळत आहेत. तसेच गोवा भाजपमध्ये अजूनही धुसफूस सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे राणेंच्या पुढील खेळीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्रीपदाची माळ राणेंच्या गळ्यात पडते की त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागते याचं चित्रं येत्या एक दोन दिवसात स्पष्ट होईल, असं सूत्रांनी सांगितलं.
गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रमोद सावंतच मुख्यमंत्री होतील असं सांगितलं जात होतं. मात्र, विश्वजित राणे यांनीही आपली दावेदारी केल्याने मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे निकालाला दहा दिवस उलटून गेले तरी गोव्यात भाजपला सरकार स्थापन करता आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सावंत आणि राणे यांना दिल्लीला बोलावून घेतलं होतं. या दोन्ही नेत्यांनी सावंत आणि राणेंशी मॅरेथॉन चर्चा केल्याचं वृत्त आहे. मात्र, या बैठकीतील तपशील मिळू शकला नाही.
राणेंच्या जोर बैठका
या बैठकीनंतर सावंत यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा होती. बैठक संपवून सावंत रात्री गोव्यात परतल्यानंतर या चर्चेने अधिकच जोर धरला होता. मात्र, सावंत आले तरी राणे गोव्यात न परतल्याने पुन्हा एकदा तर्कवितर्क लढवले जात आहेत. राणे दिल्लीत पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा करत असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे राणेंच्या खेळीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्सही अधिक वाढला आहे.
अपक्ष भाजपच्या बाजूने
गोव्यातील एकूण 50 जागांपैकी बहुमताला 21 जागांची आवश्यकता आहे. भाजपने 20 जागा जिंकल्या आहेत. अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये, एलेक्सियो रेजिनाल्डो लॉरेंसो आणि एंटोनियो वास यांनी आधीच भाजपला समर्थन दिलेलं आहे. तसेच एमजीपीचे आमदार रामकृष्ण ढवळीकर आणि जीत अरोलकर यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपकडे बहुमतापेक्षाही अधिकचं संख्याबळ आहे. मात्र, भाजपला पाठिंबा देणाऱ्या कुणाकुणाला भाजप मंत्रिमंडळात स्थान देणार हे बुधवारी किंवा गुरुवारीच स्पष्ट होणार आहे.
संबंधित बातम्या: