Punjab Election 2022 : पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू यांना टक्कर देणार शिरोमणी अकाली दलाचा नेता, वाचा विक्रम सिंह यांच्याबद्दल
पंजाब काँग्रेसने अमृतसर पूर्व मतदारसंघातून नवज्योत सिंग सिद्धू यांना उमेदवारी दिली आहे. ड्रग्ज प्रकरणी कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर विक्रम सिंह मजिठिया हे काँग्रेसशी टक्कर देणार आहेत.
अमृतसर : पंजाब विधानसभा निवडणूक 2022 (Punjab Election 2022) साठी सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केली आहेत. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी माहिती दिली आहे की, SAD नेते विक्रम सिंग मजिठिया (Vikram Singh Majithia) हे राज्य काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Siddhu) यांच्या विरोधात पंजाब विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. पंजाब काँग्रेसने अमृतसर पूर्व मतदारसंघातून नवज्योत सिंग सिद्धू यांना उमेदवारी दिली आहे. विक्रमसिंह मजिठिया यांना न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाल्यापासून ते काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. अलीकडेच विक्रम सिंह मजिठिया यांनी पंजाबमधील चन्नी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. मजिठिया म्हणाले होते की, इतिहासात प्रथमच 3 महिन्यांत 4 डीजीपी बदलण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी मला अडकवून पद वाचवण्याचा कट रचला आहे. पण मी नेहमीच सत्य आणि कायद्याच्या बाजूने उभा राहिलो.
विक्रम सिंह मजिठिया यांची राजकीय पार्श्वभूमी
विक्रम सिंह मजिठिया म्हणाले, पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या नातेवाईकाच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्याने काँग्रेसच्या राजवटीत भ्रष्टाचार सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे. भूपेंद्र सिंह हनी यांच्या घरातून ईडीने 10 कोटी रुपये रोख आणि सोने जप्त केले आहे. त्यावर कारवाई करण्याऐवजी काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करत आहे. विक्रम सिंह मजिठिया हे शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांचे मेहुणे आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांचे भाऊ आहेत.
मजिठिया यांनी यापूर्वी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. शिरोमणी अकाली दलाने मजिठियांविरुद्ध एफआयआर नोंदवणे हा राजकीय सूड असल्याचे म्हटले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी म्हणाले होते की, त्यांचे सरकार कोणत्याही ड्रग तस्कराला पळून जाऊ देणार नाही आणि विक्रम सिंग मजीठिया यांच्या विरोधात कायदा स्वतंत्रपणे निर्णय घेत आहे. मजिठियाविरुद्धच्या खटल्यात कोणताही राजकीय सूड नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. देशात सध्या पाच राज्याच्या निवडणुकांनी वातावरण तापवलं आहे, पंजाबमध्ये आपलं बस्तानं बसवण्यासाठी आम आदमी पार्टीही जोमाने कामाला लागली आहे.