निवडणूक आयोगाची विधानसभा निवडणुकीसाठी नियमावली, संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना डिवचलं
बंगालच्या सभांमध्ये काय झालं हे आपण सर्वांनी पाहिले आहे, त्यामुळे पंतप्रधानांनी याचा विचार करावा, असे म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधानांना डिवचले आहे.
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पाच राज्यातील निवडणूक नियमावली जाहीर केली आहे, त्यावर बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधानांनी सभा घेऊ नये, त्यांनी इतरांना एक आदर्श घालून द्यावा अशी प्रतिक्रिया दिली आहे, बंगालच्या सभांमध्ये काय झालं हे आपण सर्वांनी पाहिले आहे, त्यामुळे पंतप्रधानांनी याचा विचार करावा, असे म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधानांना डिवचले आहे. कोरोनाच्या काळात या निवडणुका पार पडत आहेत, निवडणूक आयोगाने यासाठी घालून दिलेली नियमवली सर्वांना सारखी असावी ती एका राजकीय पक्षाच्या सोयीची नसावी, निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे, असाही टोला राऊतांनी लगावला आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीत शिवसेना उतरणार?
पाच राज्यांच्या निवडणुकीत शिवसेना उतरणार का? आणि शिवसेनेची रणनिती काय असणार? असे राऊतांनी विचारले असता, निवडणुकांबाबतची राणनिती काय असणार हे आत्ताच सांगणार नाही, मात्र गोव्यात काँग्रेससोबत लढण्याबाबत आमचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत. आम्ही आमच्या मार्गाने जाऊ, कुणाला एकटे लढून निवडूण यायचे असेल तर येतील असेही राऊत म्हणाले.
बंगालमध्ये चुकीचे घडले
पश्चिम बंगलमध्ये कोरोनाचा कहर असताना निवडूक अनेक टप्प्यात घेतली ती योग्य नव्हती, ती काही नेत्यांची सोय होती, त्यांना प्रचारासाठी वेळ मिळावा म्हणून ते केले होते, असाही आरोप राऊतांनी केला आहे, बंगालमध्ये भाजपला झुकतं माप दिले गेले, असा संशय राऊतांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केला आहे. त्यामुळे निवडणुका जरी बाहेरील राज्यात असल्या तरी राज्यात या निवडणुकांवरून पुन्हा खडाखडी सुरू झाली आहे.