‘त्या’ आरोपावर विजय वडेट्टीवार संतापले… भडकले… म्हणाले, हे तर नावालाच राजे, भाजपसमोर झुकले
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भाजपमध्ये येणार असल्याचा दावा केला आहे. अत्राम यांच्या या आरोपांवर वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. हे बिनबुडाचे आरोप आहेत. गडचिरोलीत आम्ही जिंकत आहोत. म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळेच आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असा हल्लाच विजय वडेट्टीवार यांनी चढवला आहे.
राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी आज सकाळी सकाळीच मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे. काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये येणार आहेत. त्यांच्या भाजपसोबत अनेक बैठका झाल्या आहेत. त्या चर्चांचा मी साक्षीदार आहे. मी आदिवासी माणूस आहे. आदिवासी खोटं बोलत नाही. वडेट्टीवार हे अशोक चव्हाण यांचे राईट हँड आहेत. त्यामुळेच ते भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट धर्मरावबाबा अत्राम यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले आहे. धर्मरावबाबा यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. भाजप गडचिरोलीत पराभूत झाली तर मंत्रिपद जाईल ही भीती असल्याने बिनबुडाचे आरोप सुरू आहेत, असा संताप विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
विजय वडेट्टीवार मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी ते अत्राम यांच्यावर चांगलेच भडकले होते. गडचिरोली मतदारसंघ काँग्रेसमय झाला आहे. या मतदारसंघात भाजपचा पराभव दिसत आहे. गडचिरोलीत पराभव झाला तर आपलं मंत्रिपद जाईल याची धर्मराव बाबा अत्राम यांना भीती वाटत आहे. म्हणूनच ते माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांना ही बुद्धी कुठून सूचली? गडचिरोलीत मी तळ ठोकून आहे म्हणूनच मला त्रास देण्यासाठी हा आरोप केला जात आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.
लीड मिळवून दाखवा, आव्हान देतोय
या मतदारसंघात भाजपला लीड मिळवून दाखवा. माझं धर्मराव बाबा अत्राम यांना आव्हान आहे. भाजपमध्ये जाण्यासाठी माझी जर धर्मरावबाबांसमोर चर्चा झाली असेल तर त्यांची नार्को टेस्ट करा, असं आव्हानच वडेट्टीवार यांनी दिलं. तुम्हाला महायुतीत कोणी कुत्रं विचारत नाही. उद्या तुम्हाला उमेदवारी मिळणार की नाही याची शाश्वती नाही. तुमची लोकसभा निवडणुकीत गोची केलीय. महायुतीत जाऊन तुम्ही गुलामासारखं जगत आहात. दुसऱ्याला उगाच बदनाम करू नका, असा इशाराच वडेट्टीवार यांनी दिला आहे.
हे कसले राजे?
स्वतः बेइमानी करायची, पक्ष फोडायचे, पाप करायचे त्यावर पांघरूण घालण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करायचे, हे धंदे सोडा. हे बिनबुडाचे आरोप आहेत. गडचिरोली आम्ही जिंकत आहोत. सर्व सूत्रं हातात घेतली आहेत. पराभव समोर दिसत आहे म्हणून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. हे नावाला राजे आहेत. त्यामुळे हे भाजप समोर झुकले. इतरांनी भाजपसमोर झुकावं अशी यांची इच्छा असेल, पण आम्ही स्वाभिमानी आहोत. काँग्रेसला जिंकून देऊ. 4 जूनला कळेल गडचिरोलीमध्ये काँग्रेस राजा आहे आणि यांची जागा यांना दिसेल, असंही ते म्हणाले.