मुंबई: उत्तर प्रदेश (uttar pradesh) आणि गोव्यात आम्हाला यश आलं नाही. पण ही तर सुरुवात आहे. सुरुवात करणं गरजेचं असतं. सर्वच पक्षाने कधी ना कधी सुरुवात केली होती. त्यामुळे आम्ही लढत राहू. इतर सर्व राज्यातील निवडणुका आण्ही लढवणार आहोत, या मतावर आम्ही ठाम आहोत. कधी तरी पर्याय म्हणून तिथे उभं राहू, असा विश्वास शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी व्यक्त केला. पाच राज्यातील निवडणुकांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आदित्य ठाकरे यांनी हा विश्वास व्यक्त केला. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांना वेगवेगळे कंगोरे आहेत. पंजाबमध्ये (punjab) आप पर्याय म्हणून उभी राहिली आहे. बंगालमध्ये तृणमूल पर्याय बनली आहे. तशीच महाराष्ट्रात आघाडी पर्याय बनली आहे. देशात हे पर्याय येत आहेत, असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
लोकांना विश्वास बसणं गरजेचं होतं. शिवसेना ठामपणे उभी राहील. आता प्रत्येक निवडणूक लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे लोकांसमोर सीरियसनेस वाढेल. पुढच्या काही निवडणुकात मतांच्या मार्फत दाखवलेला विश्वास वाढेल. ही सुरुवात होती. आधी तीन जागा लढवल्या. आता 11 लढवल्या. अजून लढवू. कधी ना कधी तरी यश येईल. अनेक पक्षांची अशीच सुरुवात झाली. सुरुवातीला लढताना त्यांचं अस्तित्व नगण्य होतं. आज ते देशात पसरले आहेत. सुरुवात कुठून तरी करावी लागते ती आम्ही केली आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
यावेळी पंजाबमधील आपच्या विजयावरही त्यांनी भाष्य केलं. आपने पंजाबमध्ये पाच वर्ष मेहनत घेतली. दिल्लीत त्यांची तिसरी टर्म आहे. महाराष्ट्रात आमची पहिली टर्म आहे. तरी आम्ही महाराष्ट्राबाहेर लढण्याचं धाडस केलं. या निवडणूक निकालाने महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. उलट शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रासाठी जोमाने लढत राहील. झगडत राहील. जनतेचा आवाज बुलंद करू, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी भाजपवर बोलण्यास नकार दिला. मी त्या लोकांबाबत बोलत नाही. चांगल्या कामावर बोलतो. आम्ही हिंमतीने आणि ताकदीने लढू. ग्रामपंचायतही लढू. सातत्य ठेवणं गरजेचं आहे. ते ठेवू, असं त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही सगळे मजबूतपणे महाविकास आघाडीचं सरकार चालवत आहोत. तिन्ही पक्षाच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवत आहोत. महाराष्ट्र मॉडेल लोकांपर्यंत न्यायला अवधी लागेल पण नक्कीच नेऊ, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या: