West Bengal Election 2021 Opinion Poll Result: बंगालमध्ये पुन्हा ममता दीदीचच सरकार, भाजप दुसऱ्या नंबरवर; काँग्रेस-डाव्यांचं काय होणार? वाचा सविस्तर
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'टीव्ही 9 भारतवर्ष'ने केलेल्या सर्वात मोठ्या सर्व्हेचा निकाल आला आहे. (Mamata Banerjee's TMC Remains To Be First Choice In Assembly Elections)
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ने केलेल्या सर्वात मोठ्या सर्व्हेचा निकाल आला आहे. ‘टीव्ही9 भारतवर्ष’च्या ओपिनियन पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येणार आहे. तर भाजपही ममता बॅनर्जींना मोठी टक्कर देणार असल्याचं या ओपिनियन पोलमधून दिसून आलं आहे. (Mamata Banerjee’s TMC Remains To Be First Choice In Assembly Elections)
‘टीव्ही 9 भारतवर्ष’ने 10 हजार मतदारांचा सर्व्हे केला. विविध प्रश्नांवर त्यांची मते जाणून घेतली. 12 ते 15 मार्च दरम्यान हा पोल घेण्यात आला. त्यातून ममता बॅनर्जी यांनाच मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती असल्याचं दिसून आलं आहे. यावेळी राज्यातील गेमचेंजर मुद्दा कोणता राहील?, नंदीग्राममध्ये कोण जिंकणार? ममता बॅनर्जींवर निवडणुकी दरम्यान झालेला हल्ला आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? आदी प्रश्न या सर्व्हेत विचारण्यात आले. विविध भागात हा सर्व्हे करण्यात आला. त्यातून ममता बॅनर्जी हाच फॅक्टर बंगालमध्ये चालणार असल्याचं दिसून आलं आहे.
भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (Mamata Banerjee) यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांना मतदारांची सहानुभूती मिळताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, 3 आमदार असलेला भाजप प्रमुख विरोधी पक्ष होऊ शकतो. टीएमसीला 43.1 टक्के, भाजपला 38.8 टक्के, काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्या आघाडीला 11.7 टक्के मतं मिळू शकतात तर इतरांना 6.4 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.
डाव्यांना धक्का?
तब्बल 25 हून अधिक वर्षे बंगालची एकहाती सत्ता सांभाळणाऱ्या डाव्या पक्षांना या निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांचं कमबॅक होणार असलं तरी राज्याती प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप उदयास येत असल्याने राज्यातील डाव्यांचं वर्चस्व कमी कमी होतांना दिसून येत आहे. डाव्यांच्या हातून सत्ता गेली आणि आता विरोधी पक्षनेतेपदही जाणार असल्याचं ओपिनियन पोलमधून दिसत आहे. डाव्यांसाठी हा मोठा धक्का असून त्यांना आता पक्षाची पुनर्रबांधणी करण्याशिवाय गत्यंतर राहणार नसल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर, काँग्रेसला बंगालच्या अस्तित्वाच्या निवडणुकीत प्रचंड संघर्ष करावा लागणार असल्याचं दिसून येत आहे.
नंदीग्रामही दीदींचेच
ओपिनियन पोलनुसार नंदीग्राममध्ये मतदारांची पसंती ममता बॅनर्जींना असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांच्या अडचणी वाढल्याचं पोलमधून दिसतं. सर्व्हेनुसार 50 टक्के मतदारांनी ममता बॅनर्जी यांना, 40.7 टक्के मतदारांनी सुवेंदू अधिकारी यांना तर 9.3 टक्के मतदारांनी मीनाक्षी मुखर्जी यांना पसंती दिली आहे. त्यामुळे अधिकारी घराण्याचा नंदिग्रामचा बालेकिल्ला ढासळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दीदीच हव्या
मुख्यमंत्री म्हणून बंगालच्या जनतेने सर्वाधिक पसंती ममता बॅनर्जी यांच्या नावाला दिली. ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री व्हाव्यात असं 51.8 टक्के लोकांनी म्हटलं आहे. तर 24.4 टक्के लोकांनी दिलीप घोष, 5.2 टक्के लोकांनी सुवेंदू अधिकारी, 7.9 टक्के लोकांनी सौरव गांगुली, 4.6 टक्के लोकांनी मिथुन चक्रवर्ती आणि 2.2 टक्के लोकांनी अदीर रंजन चौधरी यांच्या नावाला पसंती दिली आहे.
‘एम’ फॅक्टरच चालणार, पण…
बंगालच्या निवडणुकीत एम फॅक्टर जोरात आहे. एम म्हणजे ममता, मोदी आणि मुस्लिम. परंतु टीव्ही9च्या ओपिनियन पोलनुसार बंगालच्या निवडणुकीत सर्वाधिक चालणारा मुद्दा ममता बॅनर्जी याच आहेत. दुसरा मुद्दा मोदी आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर मुस्लिम फॅक्टर आहे. चौथ्या नंबरवर परप्रांतियांचा मुद्दा आणि नंतर भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था हे मुद्दे असणार असल्याचं दिसून आलं आहे. ममता बॅनर्जी फॅक्टरला 39.7 टक्के, मोदी फॅक्टरला 28.6 टक्के, मुस्लिम फॅक्टर 6.3 टक्के. परप्रांतियांचा फॅक्टर 4.8 टक्के, भ्रष्टाचार फॅक्टर 14.4 टक्के आणि कायदा सुव्यवस्था फॅक्टरला 6.2 टक्के लोकांनी कौल दिला आहे. (Mamata Banerjee’s TMC Remains To Be First Choice In Assembly Elections)
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 19 March 2021https://t.co/87shIouBPr
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 19, 2021
संबंधित बातम्या:
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी फॅक्टरमध्ये लढाई
पश्चिम बंगालमध्ये कोण बाजी मारणार? सर्वात मोठा ओपिनियन पोल टीव्ही 9 नेटवर्कवर
(Mamata Banerjee’s TMC Remains To Be First Choice In Assembly Elections)