विधानसभेच्या तयारीसाठी फडणवीसांना मोदी, शाह मंत्रिमंडळातून मुक्त करणार का ?
राज्यात महायुतीला आणि खास करुन भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. २३ वरुन भाजपची संख्या ९ वर आली आहे. त्यामुळे याची जबाबदारी फडणवीसांनी घेतली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे.
महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी फडणवीसांनी स्वीकारली आहे आणि उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचीही इच्छा व्यक्त केली. पक्षांसाठी पूर्ण वेळ संघटनात्मक काम करुन विधानसभेत ताकदीनं उतरणार असं फडणवीस म्हणालेत. त्यामुळं फडणवीसांनी राजीनामा दिलाच तर, ते प्रदेशाध्यक्ष होणार का ? अशी चर्चा सुरु झालीये.
महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत, फडणवीसांनी थेट, उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केलीये. भाजप महाराष्ट्रात 23वरुन 9 खासदारांवर आली. त्याचीच जबाबदारी स्वीकारुन विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा वैयक्तिक निर्णय घेतला. अर्थात सध्या बॉल मोदी शाहांच्या कोर्टात आहे.
महाराष्ट्रात 45 प्लसची घोषणा भाजपनं केली होती. मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला 17वरच रोखलं. महायुतीला 17 जागा आणि महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्यात. एक अपक्ष सांगलीचे विशाल पाटील सुद्धा काँग्रेसचेच असल्यानं ते सुद्धा महाविकास आघाडीचाच एक भाग आहेत. याचाच अर्थ 17 विरुद्ध 31 असा सामना महाविकास आघाडीनं जिंकला. ज्यात भाजपचा मोठा पराभव झाला. 2019 मध्ये भाजप 23 खासदारांवर होती. आता भाजप सिंगल डिजीट म्हणजे 9 खासदारांवर आली. म्हणजेच 14 जागांचं नुकसान झालं
पण आता पराभवाची जबाबदारी स्वीकारुन, पक्षाचं काम करण्याची इच्छा फडणवीसांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केली. मात्र फडणवीसांची पत्रकार परिषद होताच, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनीही पत्रकार परिषद घेतली. आणि फडणवीस मंत्रिमंडळात राहूनही पक्षाचं काम करु शकतात, असं सांगून उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं म्हटलं.
इकडे मुख्यमंत्री शिंदेंनीही, फडणवीसांशी बोलणार असून निकालाची जबाबदारी सामूहिक असल्याचं म्हटलंय. शिंदेंच्या बंडानंतर, युतीचं सरकार आलं. त्यावेळीही फडणवीसांनी शिंदेंचं मुख्यमंत्रिपदाचं नाव घोषित करताना, मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणार आणि पक्षाचं काम करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरुन फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आता लोकसभेचे निकाल आलेत आणि 6 महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळं सरकारमध्ये अडकून राहण्यापेक्षा संघटनात्मक काम करण्यावर फडणवीसांचा भर आहे.
लोकसभेचे निकाल पाहता विधानसभेसाठी पक्षाचं नेतृत्वं बदलण्याचं ठरलं का ? फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देवून प्रदेशाध्यक्ष व्हायचंय का ? बावनकुळेंना मंत्रिमंडळात संधी देवून फडणवीस नवे प्रदेशाध्यक्ष होणार ? प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेवून भाजपचं नेतृत्वं फडणवीस करणार का ?
महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला. महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष ठरली. त्यामुळं संघटना मजबूत करण्यासाठी आणि आतापासूनच विधानसभेच्या तयारीसाठी फडणवीसांना मोदी, शाह मंत्रिमंडळातून मुक्त करणार का ?, हे लवकरच दिसेल.