‘हॅलोवीन पार्टी’च्या ‘त्या’ गर्दीत 24 वर्षीय अभिनेत्याने गमावला जीव; चाहत्यांना धक्का!
'हॅलोवीन पार्टी' ठरली काळरात्र! 151 मृतांमध्ये 24 वर्षीय अभिनेत्याचा समावेश
सोल: दक्षिण कोरियात ‘हॅलोवीन पार्टी’ अनेकांसाठी काळरात्र ठरली. शनिवारी हॅलोवीन साजरा करण्यासाठी अरुंद रस्त्यावर जमलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत तब्बल 151 जणांनी आपले प्राण गमावले. यात 24 वर्षीय अभिनेता आणि गायक ली जिहानचाही समावेश होता. हॅलोवीन सेलिब्रेशनदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ली जिहानसुद्धा अडकला होता. ली जिहानच्या निधनाच्या वृत्ताला त्याच्या टॅलेंट एजन्सीने दुजोरा दिला आहे.
दक्षिण कोरियातील इतेवॉन मार्गावर हॅलोवीन साजरा करण्यासाठी अनेकजण जमले होते. या दुर्घटनेबाबत जगभरातील नेते आणि राष्ट्रप्रमुखांनी शोक व्यक्त केला आहे. “के पॉप गायक आणि अभिनेता ली जिहान आपल्यात नाही. त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली आहे. त्याच्या आत्म्याला शांती मिळो”, असं त्याच्या एजन्सीने म्हटलंय.
ली जिहानने 2017 मध्ये ‘प्रोड्युस 101 सिझन 2’ या शोद्वारे करिअरची सुरुवात केली होती. या शोमधून त्याला प्रसिद्धी मिळाली. मात्र पाचव्या एपिसोडमध्ये तो बाद झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये ‘टुडे वॉज अदर नाम ह्युन डे’ या वेब शोमध्ये त्याने भूमिका साकारली. ली जिहानने नुकतीच त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र हॅलोवीन पार्टीच्या रात्रीत त्याने आपला जीव गमावला.
चेंगराचेंगरीची घटना पाहणाऱ्यांनी सांगितलं की या रस्त्यावरील अरुंद गल्लीत गर्दी आणि वाहनांची दाटीवाटी झाली होती. त्यामुळे आपत्कालीन मदत पथक आणि रुग्णवाहिका पोहोचणं अशक्य झालं होतं. या कारणामुळे मृतांची संख्या वाढली. मृतांमध्ये 19 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
का झाली चेंगराचेंगरी?
इतेवॉन शहरातील हॅलोवीन पार्टी आणि सजावट जगभरात प्रसिद्ध आहे. शनिवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे बरेच लोक हॅलोवीन डेकोरेशन आणि पार्टी करण्यासाठी इतेवॉनमध्ये जमले होते. मात्र अरुंद गल्लीमुळे एकच गोंधळ उडाला होता. लोकांना चालायला जागा नव्हती. एकमेकांना धक्के देत ते पुढे जात होते. जी लोकं उंचीने लहान होती, त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. आपत्कालीन पथकाचे जवान जेव्हा गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोहोचले, तेव्हा मागच्या बाजूच्या लोकांचा श्वसनाच्या त्रासाने तर काहींचा कार्डिॲक अरेस्टने मृत्यू झाला.