अभिनेत्रीने आधी पोस्ट केला अत्यंत आनंदी व्हिडीओ अन् काही क्षणांतच आढळली मृतावस्थेत
रविवारी सकाळी 'फ्रेंड्स' या सिटकॉममधील प्रसिद्ध अभिनेता मॅथ्यू पेरीच्या निधनानंतर मनोरंजनविश्वातील आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री रेंजुषा मेनन तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली आहे. यानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
तिरुवअनंतपुरम : 30 ऑक्टोबर 2023 | मल्याळम मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेंजुषा मेननच्या निधनाची माहिती समोर येत आहे. 35 वर्षीय रेंजुषा तिरुवअनंतपुरममधील श्रीकार्यम इथल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. मिळालेल्या माहितीनुसार, रेंजुषा त्या फ्लॅटमध्ये पतीसोबत राहत होती. गेल्या काही काळापासून ती आर्थिक समस्यांचा सामना करत होती. सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास श्रीकार्यम पोलीस ठाण्यात तिच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. रेंजुषाच्या निधनामागचं प्राथमिक कारण आत्महत्या असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. तिच्या निधनामागील कारणाचा तपास पोलीस करत आहेत.
निधनाच्या काही तासांपूर्वी पोस्ट केला व्हिडीओ
निधनाच्या काही तासापूर्वी रेंजुषाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आनंद रागमचा एक विनोदी व्हिडीओसुद्धा पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये ती अत्यंत आनंदी आणि उत्साही दिसत होती. रेंजुषाच्या अचानक निधनाच्या वृत्ताने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहेत. ‘इतका आनंदी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आत्महत्या करण्यामागचं काय कारण असू शकतं’, असा प्रश्न एका युजरने केला. तर ‘अवघ्या सेकंदात सर्वकाही बदलून जातं. तुझ्या आत्म्याला शांती लाभो’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने भावना व्यक्त केल्या आहेत.
टीव्ही अँकर म्हणून करिअरची सुरुवात
रेंजुषाने मल्याळम चित्रपट आणि मालिकांमध्ये अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. ती मूळची कोची इथली होती. एका टीव्ही चॅनलची अँकर म्हणून तिने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘स्री’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. ‘निझलट्टम’, ‘मागालुडे अम्मा’ आणि ‘बालमणी’ यांसारख्या मालिकांमध्येही तिने काम केलं. तर ‘सिटी ऑफ गॉड’ आणि ‘मेरिकुंडोरू कुंजाडू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. ‘आनंदरागम’ या टीव्ही शोमध्ये ती अखेरची झळकली होती. अभिनेत्रीसोबतच ती कुशल नृत्यांगनासुद्धा होती. रेंजुषाने भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं होतं.
रेंजुषाचा पती मनोजसुद्धा टीव्ही इंडस्ट्रीत सक्रीय आहे. तिच्या आत्महत्येमागचं कारण शोधण्यासाठी पोलीस पतीचीही चौकशी करणार आहेत. सोमवारी सकाळी रेंजुषा बराच वेळ तिच्या रुमचं दार उघडत नव्हती. म्हणून जेव्हा तिचा दरवाजा तोंडण्यात आला, तेव्हा ती मृतावस्थेत आढळली.