‘अ परफेक्ट मर्डर’चा महिला दिन विशेष प्रयोग; एक सरळ सोपी केस की न उलगडलेलं कोडं?

'अ परफेक्ट मर्डर' या नाटकाचा महिला दिन विशेष प्रयोग येत्या 8 मार्च रोजी यशवंत नाट्यगृह, माटुंगा इथं पार पडणार आहे. थरार आणि उत्कंठेचा जबरदस्त अनुभव घ्यायचा असेल, तर 'अ परफेक्ट मर्डर'चा हा खास प्रयोग चुकवू नका.

अ परफेक्ट मर्डरचा महिला दिन विशेष प्रयोग; एक सरळ सोपी केस की न उलगडलेलं कोडं?
'अ परफेक्ट मर्डर'चा महिला दिन विशेष प्रयोग
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 04, 2025 | 3:17 PM

थरार, रहस्य आणि उत्कंठा यांचा परिपूर्ण मिलाफ म्हणजे ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटाच्या मराठी रुपांतराने रंगभूमीवर एक वेगळी छाप पाडली आहे. गूढता आणि रहस्य उलगडत ठेवणाऱ्या या नाटकाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या मास्टरपीसच्या मराठी रुपांतराचा पहिला प्रयोग २१ डिसेंबर २०१८ रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे सादर झाला आणि हाऊसफुल्ल गेला. प्रेक्षकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने या नाटकाने रंगभूमीवर आपली ओळख निर्माण केली.

सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये पुष्कर श्रोत्रीने नवऱ्याची भूमिका, डॉ. श्वेता पेंडसेनं पत्नीची भूमिका आणि सतीश राजवाडे यांनी इन्स्पेक्टर घारगे यांची भूमिका ताकदीने साकारली. पुढच्या प्रयोगांमध्ये कलाकारांच्या उपलब्धतेनुसार, पुष्कर श्रोत्री कधी नवरा तर कधी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसले, तर अनिकेत विश्वासराव नवऱ्याच्या भूमिकेत झळकला.

या नाटकाने घेतलेले एक अनोखे वळण म्हणजे इन्स्पेक्टरच्या भूमिकेला महिला स्वरूप देण्यात आले. पहिल्या ८५ प्रयोगांमध्ये पत्नीची भूमिका प्रभावीपणे साकारल्यानंतर, काही वैयक्तिक कारणांमुळे ब्रेक घेतलेल्या डॉ. श्वेता पेंडसेनं इन्स्पेक्टर घारगे या वेगळ्याच आणि ताकदीच्या भूमिकेत पुनरागमन केलं. मराठी रंगभूमीवर एका अभिनेत्रीने अशा दोन अत्यंत वेगळ्या भूमिका मोठ्या अंतराने साकारण्याचा हा दुर्मिळ प्रसंग ठरला आहे.

महिला विशेष प्रयोग – ८ मार्च २०२५
दुपारी ४.०० वाजता यशवंत नाट्यगृह, माटुंगा

आता ‘अ परफेक्ट मर्डर’च्या रंगभूमीवर एक खास महिला विशेष प्रयोग सादर होणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च २०२५ रोजी डॉ. श्वेता पेंडसे पुन्हा इन्स्पेक्टर घारगेच्या भूमिकेत दिसणार आहे. हा प्रयोग केवळ एक नाट्यकृती नसून, स्त्रीसशक्तीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. एका रहस्यमय कथानकाच्या पार्श्वभूमीवर उभी राहणारी ही महिला पात्रे समाजातील बदल, सक्षमता आणि धाडस यांचे प्रतीक ठरत आहेत.

लेखक, नेपथ्य – नीरज शिरवईकर
दिग्दर्शक – विजय केंकरे
संगीत – अजित परब
गायिका – मुग्धा कऱ्हाडे
प्रकाशयोजना – शीतल तळपदे
वेशभूषा – मंगल केंकरे
निर्माते – माधुरी गवांदे, निनाद कर्पे