मालेगावात खळबळजनक प्रकार, ‘टायगर 3’ची डरकाळी सुरू होताच थिएटरमध्ये रॉकेट आणि फटाक्यांची आतिषबाजी, व्हिडीओ व्हायरल
सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट धमाका करताना दिसतोय. टायगर 3 या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ हे मुख्य भूमिकेत दिसले. चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. आता एक धक्कादायक घटना घडलीये.
मुंबई : सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट रिलीज झालाय. प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह हा देखील बघायला मिळतोय. मात्र, एक अतिशय धक्कादायक असा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले. इतकेच नाही तर चाहत्यांच्या अतिउत्साहामुळे थिएटरचे देखील मोठे नुकसान झाले. चक्क चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके, बाॅम्ब आणि राॅकेट उडवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. थिएटरमधील काही लोक या धक्कादायक प्रकारानंतर घाबरून जीव वाचवून पळून जाताना दिसत आहेत.
हा सर्व धक्कादायक आणि निंदनीय प्रकार महाराष्ट्रामधील मालेगाव येथे घडलाय. घडलेल्या प्रकारानंतर मोठे नुकसान देखील झाले आहे. प्रेक्षकांच्या या अतिउत्साहामुळे जीवितहानी होण्याची देखील दाट शक्यता होती. कारण ज्यावेळी थिएटरमध्ये हे बाॅम्ब आणि राॅकेट उडवली जात होते, त्यावेळी लहान मुलांची संख्या देखील लक्षणीय दिसतंय.
थिएटरमध्ये हुल्लडबाजी करून फटाक्यांची जोरदार आतिषबाजी होताना दिसतंय. मालेगावच्या मोहन टॉकीजमध्ये रात्री 9 ते 12 च्या शो दरम्यान हा प्रकार घडलाय. थेट सुतळी बॉम्ब देखील थिएटरमध्ये फोडण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इतर प्रेक्षकांचा गोंधळ उडाला आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक मोठ्या प्रमाणात व्हायरल करताना देखील दिसत आहेत.
Salman Khan Fans bursted fire crackers inside the cinema hall in Malegaon which caused stampede like situation.
— Rishi Bagree (@rishibagree) November 13, 2023
आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून फटाके थेट थिएटरमध्ये वाजवल्यामुळे थिएटरला आग लागण्याची देखील दाट शक्यता होती. विशेष म्हणजे या सर्व प्रकारानंतर पोलिसांकडून थिएटरमध्ये फटाके फोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील केली गेलीये. कलम 112 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मालेगावच्या छावणी पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात प्रेक्षकांवर कलम 112 अंतर्गत कारवाई करण्यात आलीये. 2 जणांना ताब्यात घेऊन चाैकशी करण्यात आली आणि त्यांना सोडण्यात देखील आले. या घटनेनंतर मालेगाव पोलीस पोलीस हे अॅक्शन मोडवर आल्याचे दिसतंय. मात्र, हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून तो संताप व्यक्त करताना देखील मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.