तारा सुतारिया नव्हे तर ‘ही’ होणार कपूर घराण्याची सून? दिवाळी पार्टीत हातात हात घालून दिसले एकत्र
राज कपूर यांचा नातू आदर जैन सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दिवाळी पार्टीत आदरला त्याच्या नव्या गर्लफ्रेंडसोबत पाहून नेटकऱ्यांचा आश्चर्याचा धक्काच बसला. गेल्या काही वर्षांपासून तो अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. मात्र या दोघांचं नुकतंच ब्रेकअप झालं होतं.

मुंबई : 14 नोव्हेंबर 2023 | बॉलिवूडमध्ये कपूर घराण्याचं एक वेगळंच महत्त्व आहे. या घराण्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीही घडलं तरी त्याबद्दल जाणून घेण्यास चाहते अत्यंत उत्सुक असतात. राज कपूर यांचा नातू आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचा चुलत भाऊ आदर जैन सध्या त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही वर्षांपासून आदर हा अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. कपूर कुटुंबातील विविध कार्यक्रमांमध्येही ताराने आदरसोबत हजेरी लावली होती. इतकंच काय तर या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र अचानक त्यांनी ब्रेकअप केलं आणि त्यानंतर आता आदर एका नव्या मुलीसोबत दिवाळी पार्टीत दिसला. दिवाळी पार्टीत आदर त्या मुलीचा हात पकडलेला दिसला आणि त्याचा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत आलेखा अडवाणीला डेट करत असल्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे आलेखा ही आदर आणि तारा या दोघांची मैत्रीण होती. आदरने त्याचं रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर या तिघांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
सोमवारी आदरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला. यामध्ये तो आलेखाचा हात त्याच्या हातात घेतल्याचं पहायला मिळत आहे. ‘माझ्या आयुष्यातील प्रकाश’ असं कॅप्शन देत त्याने हा फोटो पोस्ट केला. करीना कपूर आणि सैफ अली खानच्या घरातील दिवाळी पार्टीत आलेखासोबत त्याला पाहिल्यानंतर या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. यादरम्यान रेडिटवर आलेखा, आदर आणि तारा या तिघांचा जुना फोटो व्हायरल झाला. आलेखाने तारा सुतारिया आणि आदर जैनला या फोटोमध्ये टॅग केलं होतं. तिघांचा हा सेल्फी होता आणि त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलेलं, ‘नेहमीच तिसरी चाक’. यावरूनही नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.




View this post on Instagram
View this post on Instagram
तारा आणि आदर यांनी 2020 मध्ये त्यांचं नातं जगजाहीर केलं होतं. त्याच्या आधीपासूनच दोघं एकमेकांना डेट करत होते. ताराने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर दुसरीकडे आलेखा अडवाणी ही ‘वे वेल’ या मुंबईतील कम्युनिटीची संस्थापिका आहे. या कम्युनिटीअंतर्गत वेलनेस इव्हेंट्स, वर्कशॉप्स, सेशन्स आणि रिट्रीट्स आयोजित केले जातात. आलेखाने न्यूयॉर्कमधील कॉर्नेल हॉटेल स्कूलमधून पदवीचं शिक्षण घेतलंय. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला बरेच बॉलिवूड सेलिब्रिटी फॉलो करतात. यामध्ये कियारा अडवाणी, अथिया शेट्टी आणि तारा सुतारिया यांचा समावेश आहे.