‘आई कुठे काय करते’ हे नाव कोणी सुचवलं? अनिरुद्धची कास्टिंग कशी झाली? मिलिंद गवळींकडून खुलासा
'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असताना त्यात अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. स्थलांतरित पक्ष्यांसारखे सगळे उडून गेले, असं त्यांनी त्यात म्हटलंय.
तब्बल 1400 हून अधिक भाग पूर्ण करणारी स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’नं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेत मधुराणी प्रभुलकर, मिलिंद गवळी, रुपाली भोसले यांसह इतरही अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. इतकी वर्षे एकमेकांसोबत काम करणारे हे कलाकार आता मालिका संपल्यानंतर अत्यंत भावूक झाले आहेत. सोशल मीडियाद्वारे नेहमीच आपल्या भावना मोकळेपणे व्यक्त करणारे अभिनेता मिलिंद गवळी यांनी मालिका संपल्यानंतर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मालिकेची संकल्पना कशी सुचली, त्याचं शीर्षक कोणी सुचवलं, त्यातील कलाकारांची निवड कोणी केली, याविषयी सविस्तरपणे लिहिलंय.
मिलिंद गवळी यांची पोस्ट-
‘Memories/आठवणी… मागे राहतात. गेल्या पाच वर्षांच्या असंख्य आठवणी मागे राहिल्या आहेत. हे आमचं कलाक्षेत्र किती मजेशीर आहे. एका माणसाच्या डोक्यात, एक विचार येतो, एक कल्पना सुचते. मग तो एका लेखकाला ती कल्पना लिहून काढायला सांगतो. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची कल्पना बंगाली लेखिका लीना गंगोपाध्याय यांच्या डोक्यात आली. त्यावरून ‘श्रीमोई’ ही बंगाली मालिका तयार झाली. मग स्टार प्रवाह आणि राजन शाही यांनी तशीच मालिका मराठी प्रेक्षकांसाठी करावी असा विचार केला. ‘आई कुठे काय करते’ हे शीर्षक स्टार प्रवाहचे मुख्य अधिकारी सतीश राजवाडे यांनी सुचवलं.
राजनजींनी नमिता वर्तक हिच्याकडे ही मालिका करायची जबाबदारी दिली. गोष्ट तयार झाली, त्यातले पात्र तयार झाले आणि मग महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचं कास्टिंग आणि अनिरुद्ध देशमुख नावाच्या मुख्य पात्रासाठी नमिताने मला विचारलं. कमीत कमी चार-पाच कलाकारांची नावं त्यांनी काढली असतीलच. पण त्यात नमिताने माझी निवड केली. राजनजींची त्यांच्या ऑफिसमध्ये भेट झाली, तेव्हा राजनजींच्या मनात मी अनिरुद्ध साकारू शकेन की नाही याबद्दल थोडी शंका मला जाणवली, पण नमितावर विश्वास ठेवून त्यांनी माझ्या कास्टिंगला होकार दिला. नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांची शंका अगदी बरोबर होती. कारण ‘श्रीमोई’मधला अनिरुद्ध फारच भारदस्त authoritative personality चा होता. पण त्या बिचाऱ्या मराठीतल्या अनिरुद्धच्या नशिबात मी होतो. त्याला तो तरी काय करणार?
View this post on Instagram
पण 1491 भाग पूर्ण होऊन आज ही मालिका निरोप घेत आहे. ही अनिरुद्धची भूमिका मी साकारू शकलो की नाही मला माहिती नाही. पण प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्की केला. अजून खूप काही करता आलं असतं, पण आता वेळ निघून गेली. आज ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा प्रवास संपला. स्थलांतरित पक्ष्यांसारखे सगळे उडून गेले. पुन्हा एकत्र येतील की नाही माहित नाही.
‘लगान’ची टीम पुन्हा तयार होत नसते. आता फक्त मागे आठवणी ठेवून सगळे आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेले. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने सगळ्यांनाच भरभरून दिलं. माझ्यासाठी राजन शाही, नमिता वर्तक, डी के पी परिवार, सतीश राजवाडे आणि स्टार प्रवाह परिवार यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, सातत्याने सांभाळून घेतलं, प्रोत्साहन दिलं, आधार दिला, इतक्या लांबचा प्रवास गाठण्यासाठी ताकद दिली, त्यांचा मी ऋणी आहे. माझ्या अफलातून सहकलाकारांचा आणि संपूर्ण ‘आई कुठे काय करते’च्या टीमचा खूप खूप आभारी आहे,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी मिलिंद जेव्हा मालिकेच्या सेटवर राहिलेलं सामान घ्यायला गेले, तेव्हा समृद्धी बंगल्याचा सेट पाडताना पाहून ते भावूक झाले होते. याविषयीही त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती.