Nawazuddin Siddiqui : पत्र लिहून आलियाने मागितली नवाजुद्दिनची माफी, नंतर अचानक अकाऊंट झाले गायब
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची माजी पत्नी आलियाने त्याच्यावर बरेच आरोप केले होते. मात्र आता तिने लिहीलेले एक पत्र व्हायरल होत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीमध्ये (Nawazuddin Siddiqui) गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले वादळ शमताना दिसत आहे. नवाज आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी (Aalia siddiqui) त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहेत. दोघेही एकमेकांविरुद्ध बरेच काही बोलले आहेत. कोर्टाच्या चकरा मारणे आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर या जोडप्याने आता समेट करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याची सुरुवात नवाजची पत्नी आलियाने केली आहे.
आलिया सिद्दीकीची एक सोशल मीडिया पोस्ट इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टच्या माध्यमातून आलिया नवाजची माफी मागताना दिसत आहे. नवाजची पत्नी भूतकाळ विसरून आयुष्यात पुढे जाण्याविषयी बोलत आहे. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी तिने नवाजलाही माफ करण्याचे मान्य केले आहे. नवाजच्या पत्नीने तिचे हिंदीतील पत्र शेअर केले आहे. ज्यात तिने बरंच काही लिहिलं आहे.
व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, आलियाने लिहिले आहे की, ‘ आयुष्य हे पुढे जाण्याचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांत त्या दोघांमध्ये जे काही घडले ते तिला विसरून जायचे आहे. तिने केलेल्या चुकांची माफी मागून आणि त्याने (नवाजुद्दीनने) केलेल्या चुका माफ करून तिला पुढे जायचे आहे. तिच्या पोस्टमध्ये आलियाने चांगल्या भविष्यासाठी भूतकाळात अडकून न पडण्याबद्दल सांगितले आहे. इतकंच नाही तर आलिया आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक नवीन सुरुवात करण्याबद्दल बोलली आहे आणि भूतकाळात केलेल्या चुका पुन्हा न करण्याबद्दलही तिने बरंच काही लिहीलं आहे. ‘
मात्र आलियाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिचे इंस्टाग्राम अकाउंट आता दिसत नाही. कदाचित कोणीतरी तिचे अकाऊंट डिलीट केले असावे किंवा हॅक केले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. पण सोशल मीडियावर, अनेक युजर्सनी या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. आलियाच्या या पोस्टवर कमेंट करताना नवाजच्या भावाने कमेंट केली असून. आलियाचे अकाउंट हॅक झाल्याचे त्याने नमूद केले आहे.
यापूर्वी आलिया हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. फक्त आलियाच नव्हे तर नवाजुद्दीन सिद्दीकी याचा भाऊ देखील त्याच्या विरोधात पोस्ट शेअर करताना दिसला होता. काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याने भाऊ आणि एक्स पत्नी आलिया यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला.
दुसरीकडे, नवाजच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच नेहा शर्मासोबत ‘जोगिरा सा रा रा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या संकटांदरम्यान, नवाज या चित्रपटात कॉमेडी करताना दिसणार आहे.