Aamir Khan | ‘माझ्या कुत्र्याचंही नाव आमिर ठेवणार नाही’; सख्ख्या भावानेच असं का म्हटलं होतं?
आता बऱ्याच वर्षांनंतर जुनी भांडणं विसरून फैजल आणि आमिर एकत्र आले आहेत. आमिरची बहीण निखत खानने सोशल मीडियावर आईच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले होते. यामध्ये आमिर, फैजल, निखत आणि फरहत हे आईसोबत एकत्र पोज देताना दिसले होते.
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान सध्या चित्रपटांपासून ब्रेक घेऊन कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याला प्राधान्य देत आहे. नुकतंच आमिरला त्याचा भाऊ फैजल खानसोबत आई जीनत यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये पाहिलं गेलं. एकेकाळी या दोघा भावंडांमध्ये खूप मोठा वाद सुरू होता. मात्र आता आईच्या वाढदिवसाला आमिर आणि फैजल चक्क एकमेकांची गळाभेट घेताना दिसले. त्यामुळे या दोघांमधील वाद अखेर मिटल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. एकेकाळी फैजलने आमिरवर बरेच गंभीर आरोप केले होते. ‘मेला’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. मात्र त्यानंतर दोघांनी पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही. फैजलने एका मुलाखतीत आमिरला ‘संधीसाधू’ असं म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर शाहरुख खान आणि आमिर यांच्यातील भांडणाविषयीही त्याने वक्तव्य केलं होतं.
2007 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत फैजलने आमिरवर आरोप केले होते. यावेळी त्याने आमिर आणि शाहरुख यांच्यातील शत्रुत्वाविषयी वक्तव्य केलं होतं. त्याचसोबत असा खुलासा केला होता की आमिरने त्याच्या एका पाळीव श्वानाचं नाव शाहरुख खान असं ठेवलं आहे. “मी सुद्धा ऐकलंय की पंचगणीच्या बंगल्यात जो पाळीव श्वान होता, त्याचं नाव त्याने किंवा माळीने शाहरुख खान असं ठेवलं होतं. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं”, असं फैजल म्हणाला होता. इतकंच नव्हे तर फैजलने असंही म्हटलं होतं की, “मी माझ्या श्वानाचं नाव कधीच आमिर ठेवणार नाही. कारण श्वान हे खूपच प्रामाणिक, संवेदनशील आणि बुद्धिमानी असतात. आमिरमध्ये यापैकी कोणतेच गुण नाहीत.”
View this post on Instagram
आता बऱ्याच वर्षांनंतर जुनी भांडणं विसरून फैजल आणि आमिर एकत्र आले आहेत. आमिरची बहीण निखत खानने सोशल मीडियावर आईच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले होते. यामध्ये आमिर, फैजल, निखत आणि फरहत हे आईसोबत एकत्र पोज देताना दिसले होते.
2007-08 मध्ये फैजलने त्याच्या कुटुंबीयांविरोधातील कायदेशीर लढाई लढली होती. कोर्टाच्या निर्णयानंतर दिलेल्या मुलाखतीत त्याने स्पष्ट केलं होतं, “मी कधीच आजारी नव्हतो. आतापर्यंत ज्या अफवा पसरवल्या गेल्या त्या सर्व खोट्या आहेत. माझा मोठा भाऊ आमिर खान आणि इतर कुटुंबीयांनी त्या अफवा पसरवल्या आहेत. किंबहुना, माझं अपहरण करण्यात आलं होतं. मला घरात बंदिस्त केलं गेलं, औषधं दिली गेली. मला सामान्य व्यक्तीप्रमाणे जगायचं आहे.” फैजलने कयामत से कयामत तक, जो जिता वही सिकंदर, मदहोश, मेला, काबू, दुश्मनी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2003 मध्ये त्याने आंधी या मालिकेतही भूमिका साकारली होती.