आमिर खानचा पूर्व पत्नीसोबत रोमँटिक डान्स; लेकीच्या लग्नातील नवा व्हिडीओ समोर
आमिर खानची लेक आयरा खान यावर्षी जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकली. उदयपूरमध्ये धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाचा एक नवीन व्हिडीओ आयराने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान हिने जानेवारी महिन्यात बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी लग्न केलं. आधी मुंबईत आणि त्यानंतर उदयपूरमध्ये अत्यंत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नातील काही व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या नव्या व्हिडीओमध्ये आमिर हा त्याची पहिली पत्नी रिना दत्ताचा हात पकडून तिच्यासोबत डान्स करताना दिसतोय. आयरा आणि नुपूर यांच्या लग्नातील प्रत्येक क्षण या व्हिडीओत कैद करण्यात आला आहे. दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचा हा खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यामध्ये आमिर खान, त्याच्या दोन्ही पूर्व पत्नी रिना दत्ता आणि किरण राव, आझाद राव खान, इम्रान खान आणि त्याची गर्लफ्रेंड पहायला मिळत आहेत.
या व्हिडीओमध्ये मुलीच्या लग्नात भावूक झालेला आमिर म्हणताना दिसतोय, “ती खूप लवकर मोठी झाली. माझ्यापेक्षाही खूप लवकर.” आयरा ही आमिर आणि त्याची पहिली पूर्व पत्नी रिना दत्ताची मुलगी आहे. मात्र तिच्या लग्नात आमिरच्या दुसऱ्या पूर्व पत्नीनेही मोलाचं योगदान दिलंय. किरणने लग्नाच्या तयारींमध्ये रिना आणि आयराला खूप मदत केली. तिनेही या व्हिडीओमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओच्या अखेरीस आमिर आणि रिना एकमेकांसोबत डान्स करताना दिसून येत आहेत.
View this post on Instagram
आयरा आणि नुपूरच्या हळदीच्या कार्यक्रमातही आमिरच्या दोन्ही पूर्व पत्नींनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. यावेळी दोघीही नऊवारी साडी नेसून कार्यक्रमाला पोहोचल्या होत्या. रिना आणि किरण यांच्यातील मैत्री याआधीही अनेकदा चर्चेत आली आहे. एकमेकींच्या सवत असूनही दोघींना नेहमीच एकमेकांसोबत मैत्रिणींसारखं वावरताना पाहिलं गेलंय. आमिर खानने 18 एप्रिल 1986 रोजी रिना दत्तासोबत लग्न केलं होतं. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. पण 2002 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर आमिर आणि रिना विभक्त झाले. त्यानंतर आमिरने किरण रावशी 2005 मध्ये लग्न केलं. आमिरचं हे दुसरं लग्नही टिकलं नाही. 2021 मध्ये किरण आणि आमिरने घटस्फोट घेतला.
आमिरला पहिल्या पत्नीपासून आयरा ही मुलगी आणि जुनैद हा मुलगा आहे. तर किरण राव आणि आमिर यांना आझाद हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही आमिरने दोन्ही पूर्व पत्नींसोबत मैत्रीचं नातं जपलं आहे. पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी हे तिघं अनेकदा एकत्र येताना दिसतात.