बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री काजोल यांचा ‘फना’ हा चित्रपट 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. यामध्ये आमिर आणि काजोलच्या मुलाची भूमिका साकारणारा चिमुकला आता बराच मोठा झाला आहे. अत्यंत निरागस दिसणाऱ्या या बालकलाकाराने आमिरपासून सलमान खानपर्यंत अनेकांसोबत काम केलंय. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘पार्टनर’मध्येही त्याने भूमिका साकारली होती. या बालकलाकाराचं नाव आहे अली. अलीने त्याच्या लहानपणी बॉलिवूडमधल्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. इतकंच नव्हे तर त्याने 100 हून अधिक जाहिरातींमध्येही भूमिका साकारल्या आहेत.
अली हाजी याचा पहिला चित्रपट ‘फॅमिली’ होता. यामध्ये तो अमिताभ बच्चन यांच्या नातूच्या भूमिकेत झळकला होता. मात्र या चित्रपटासाठी त्याला श्रेय मिळालं नव्हतं. नंतर ‘नोबेलमॅन’साठी त्याला न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. 2019 मध्ये अलीने अभिनेता हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’मध्ये सहाय्यक भूमिका साकारली होती. अली अद्याप इंडस्ट्रीत सक्रिय असून विविध प्रोजेक्ट्समध्ये तो नशिब आजमावतोय.
बालकलाकार म्हणून अलीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामुळे अभिनय आणि अभ्यास या गोष्टींमध्ये कसा ताळमेळ साधता येईल, याकडे त्याच्या आईवडिलांनी विशेष लक्ष दिलं होतं. “हा समतोल वेळेनुसार माझ्यात आला. अभिनय करणं सुरुवातीला खूप उत्साहाचं होतं. पण एका काळानंतर माझ्या आईवडिलांनी प्रोजेक्ट्स नाकारायला सुरुवात केली. जेणेकरून मला अभ्यासावर लक्ष केंद्रीत करता येईल. मी शाळेतही चांगले गुण आणावेत, अशी त्यांची अपेक्षा होती. थोडीफार लोकप्रियता चांगली, पण अभ्यासात चांगलं असणंही महत्त्वाचं असल्याचं त्यांनी शिकवलं. त्यामुळे अभ्यासावर परिणाम न होऊ देता मला थोडंफार अभिनयसुद्धा करता आलं”, असं अली एका मुलाखतीत म्हणाला होता.
24 वर्षी अली आता फक्त अभिनेताच नाही तर दिग्दर्शकसुद्धा आहे. ‘बॉम्बे ब्लिट्स’, ‘नैना दा क्या कसूर’, ‘#goals’ यांसारख्या काही लघुपटांचं दिग्दर्शन त्याने केलंय. याशिवाय प्रसिद्ध गायक मिका सिंगच्या ‘छोरी’ या गाण्याच्या व्हिडीओचं दिग्दर्शनसुद्धा त्यानेच केलंय. अभिनयापेक्षा दिग्दर्शन हे प्रेम असल्याचं तो सांगतो. “दिग्दर्शनावर माझं खूप प्रेम आहे आणि ते मी शब्दांत मांडू शकत नाही. कॅमेऱ्याच्या मागे राहून लोक कसं काम करतात, याचं मला फार कुतूहल होतं. त्यामुळे अभिनयापेक्षा मला दिग्दर्शन प्रिय आहे”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.