हा दुसरा ऑरीच वाटतोय; आमिर खानच्या मुलाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्त यांचा मुलगा जुनैद सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जुनैदचा एक व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये त्याचा मेकअप लूक पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
बहीण आयरा खानच्या लग्नात हजेरी लावल्यापासून अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद हा सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे. बुधवारी त्याला मुंबईतील पृथ्वी थिएटरबाहेर पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ शूट केले. जुनैदचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर मेकअप असल्याचं पहायला मिळतंय. मात्र जुनैदचा हा मेकअपमधील लूक नेटकऱ्यांना पसंत पडला नाही. त्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत जुनैदला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पापाराझींनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये जुनैद काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातल्याचं पहायला मिळत आहे. यावेळी तो पापाराझींना म्हणतो, “अजूनही मी मेकअपमध्येच आहे.”
जुनैदने पृथ्वी थिएटरमधील एका कार्यक्रमात शिखंडीची भूमिका साकारली होती. त्यामुळे तो तशा मेकअपमध्ये दिसून आला होता. त्याने डोळ्यांत काजळ लावलं होतं आणि कपाळावर उभा टिळासुद्धा लावला होता. त्याचा हा लूक पाहून नेटकरी म्हणाले, ‘आमिर खानचं संपूर्ण कुटुंबच विचित्र आहे.’ तर दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘हे काय आहे भावा? दुसरा ऑरी दिसतोय.’ ‘आमिरची सगळी मुलं अशी विचित्र का आहेत’, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.
जुनैद खानचा व्हिडीओ
View this post on Instagram
जुनैद हा आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्त यांचा मुलगा आहे. मात्र लहानपणापासूनच तो मितभाषी आणि एकट्यात राहणं पसंत करणारा असल्याने त्याच्या भविष्याविषयी फार चिंता होती, असं आमिर एका मुलाखतीत म्हणाला होता. इतकंच नव्हे तर जुनैद हा इंडस्ट्रीतल्या सर्व स्टारकिड्सपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याला स्वबळावर सर्वकाही मिळवायचं असून अजूनही तो खाजगी कारपेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतो, असं आमिरने सांगितलं होतं.
जुनैद हा आपला सर्वांत मोठा निंदक असल्याचंही आमिरने या मुलाखतीत सांगितलं होतं. “जर मी माझ्या आयुष्यात कोणाला सर्वांत जास्त घाबरत असेन, तर तो जुनैदच आहे. तो खूप शिस्तप्रिय आहे. त्याच्या मिटींगला जर मी उशिरा गेलो, तर मला ओरडा बसतो. त्यामुळे त्याच्या मिटींग्सला मी कधीच उशिरा जात नाही.”