मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अभिनेता आमिर खानच्या दोन्ही पूर्व पत्नीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये रिना दत्ता आणि किरण राव या दोघी एकमेकींसोबत मोकळेपणे गप्पा मारताना आणि हसताना दिसल्या. त्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. आमिरने 1986 मध्ये रिना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. रिना ही आमिरची शेजारी होती असं म्हटलं जातं. जेव्हा आमिरने तिला प्रपोज केलं, तेव्हा सुरुवातीला तिने नकार दिला होता. पण नंतर 80च्या दशकाच्या सुरुवातीला दोघं एकमेकांना डेट करू लागले. आमिरच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील एका गाण्यात रिना पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. एका मुलाखतीत आमिरने रिनासोबतच्या लग्नाचा किस्सा सांगितला होता. या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं आणि या लग्नाचा खर्च अवघे दहा रुपये होता.
‘रेडिफ’ला दिलेल्या एका मुलाखतीत आमिर म्हणाला, “मी रिनाशी गुपचूप कोर्ट मॅरेज केलं होतं. आमच्या बाजूने तीन साक्षीदार होते. रिनासोबतचं माझं लग्न सर्वांत किफायतशीर होतं, असं म्हणायला हरकत नाही. मी 211 नंबरची बस पकडली आणि 50 पैशांची तिकिट काढली. वांद्रे पश्चिमला उतरून मी ब्रीजवरून पूर्वेला गेलो. तिथून मी हायवेच्या दिशेने चालत गेलो. हायवे ओलांडून मी गृहनिर्माण भवनात प्रवेश केला. तिथेच मॅरेज रेजिस्ट्रारचं ऑफिस होतं. अशा पद्धतीने माझं लग्न 10 रुपयांच्या आत झालं होतं.”
विविध मुलाखतींमध्ये आमिरने रिनासोबतच्या घटस्फोटाबद्दलही प्रतिक्रिया दिली होती. 2002 मध्ये हे दोघं विभक्त झाले. घटस्फोटानंतर रिनाने मुलगी आयरा आणि मुलगा जुनैद यांचं पालकत्व घेतलं. कॉफी विथ करणच्या सहाव्या सिझनमध्ये आमिर म्हणाला होता, “रिना आणि मी 16 वर्षे सोबत होतो. जेव्हा आम्ही विभक्त झालो, तेव्हा तो काळ आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबीयांसाठी फार त्रासदायक होता. आम्ही शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने त्या परिस्थितीचा सामना करायचा प्रयत्न केला. विभक्त झाल्यानंतरही रिना किंवा माझ्या मनातील एकमेकांविषयीचं प्रेम आणि आदर कमी झालेलं नाही.”
घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर आमिरने किरण रावशी लग्न केलं. लग्नाच्या सहा वर्षांनंतर किरणने आझाद या मुलाला जन्म दिला. तर 2021 मध्ये या दोघांनीही घटस्फोट घेतला.