मी मुस्लीम असल्याने..; आमिर खानने सांगितला ‘दंगल’च्या शूटिंगदरम्यानचा किस्सा
अभिनेता आमिर खानने पहिल्यांदाच कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने शूटिंगदरम्यानचे काही किस्से सांगितले. 'दंगल' या चित्रपटासाठी आमिरने पंजाबच्या एका छोट्याशा गावात जवळपास दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ शूटिंग केली होती.
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान नुकताच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पाहुणा म्हणून उपस्थित राहिला. यावेळी त्याने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान किस्सा सांगितला. पंजाबमधील एका छोट्याशा गावात शूटिंग करताना ‘नमस्ते’ची ताकद समजली, असं आमिर म्हणाला. पंजाबमधल्या लोकांच्या नम्रतेबद्दल कौतुक करताना आमिर म्हणाला, “पंजाबमध्ये शूटिंगसाठी अडीच महिने राहिल्यानंतर मला ‘नमस्ते’ची खरी ताकद समजली. ही खरंच एक अद्भुत भावना आहे.”
शूटिंगदरम्यानचा किस्सा
आमिरने ‘दंगल’च्या आधी ‘रंग दे बसंती’ या चित्रपटासाठीही पंजाबमध्ये शूटिंग केलं होतं. याविषयी त्याने सांगितलं, “ही कथा माझ्या खूप जवळची आहे. रंग दे बसंती या चित्रपटासाठी आम्ही पंजाबमध्ये शूट केलं होतं आणि मला तिथलं वातावरण खूप आवडलं होतं. तिथले लोक, पंजाबी संस्कृती.. तिथले लोक खूपच प्रेमळ आहेत. आम्ही ‘दंगल’साठी तिथल्या एका छोट्याशा गावात शूटिंग करत होतो. तिथल्या एका घरात आम्ही दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस शूटिंगसाठी थांबलो होतो. तुम्हाला विश्वास बसत नाही पण मी जेव्हा पहाटे 5 किंवा 6 वाजता शूटिंगच्या ठिकाणी पोहोचायचो, तेव्हा तिथले लोक फक्त माझ्या स्वागतासाठी येऊन उभे राहायचे. हात जोडून ‘सत स्त्री अकाल’ बोलण्यासाठी ते पहाटे तिथे यायचे. माझ्या स्वागतासाठी ते माझी प्रतीक्षा करायचे. त्यांनी कधीच मला त्रास दिला नाही, माझी कार कधी थांबवली नाही. पॅक-अपनंतर जेव्हा मी घरी जायला निघायचो, तेव्हा पण ते पुन्हा घराबाहेर माझी प्रतीक्षा करायचे.”
पंजाबबद्दल व्यक्त झाला आमिर
“मी मुस्लीम कुटुंबातील असल्याने मला हात जोडून नमस्ते बोलायची सवय नव्हती. ज्याप्रकारे मुस्लिमांमध्ये ‘आदाब’ केलं जातं, मी तसंच आदाब करण्यासाठी एक हात वर करायचो. पण पंजाबमध्ये अडीच महिने राहिल्यानंतर मला नमस्तेची ताकद समजली. ती भावनाच खूप सुंदर होती”, अशा शब्दांत आमिर व्यक्त झाला. कपिलच्या या शोमध्ये आमिरने त्याच्या आयुष्यातील इतरही मजेशीर किस्से सांगितले.