मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये पॉप म्युझिकचं फार महत्त्व आहे. एकेकाळी बॉलिवूडमध्ये पॉप म्युझिक कल्चर फार प्रसिद्ध होतं आणि त्याचवेळी पाकिस्तानची गायिका नाझिया हुसैनने जगभरात आपल्या गायकीने नवीन ओळख मिळवली. नाझिया हुसैनचा आवाज केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर आशिया आणि युरोपपर्यंत पोहोचला होता. तिच्या गायकीचे जगभरात असंख्य चाहते होते. मूळची पाकिस्तानची असलेल्या नाझियाने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री झीनत अमान यांच्या माध्यमातून एण्ट्री केली. झीनत अमान यांची नाझियाशी पहिली भेट लंडनमध्ये झाली होती. पहिल्याच भेटीत त्या नाझियाच्या गायकीवर खुश झाल्या होत्या.
नाझियाचा जन्म कराचीमध्ये झाला होता. तिचे वडील पाकिस्तानमधील प्रसिद्ध बिजनेसमन होते. तर नाझियाची आई मुनिजा बासिर कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये राहत होत्या आणि तिथूनच त्या सामाजिक कार्य करायच्या. जेव्हा झीनत अमान यांनी नाझियाला बॉलिवूडमध्ये घेऊन जाण्याबद्दल तिच्या आईला पहिल्यांदा सांगितलं, तेव्हा त्यांनी साफ नकार दिला होता. कारण मुस्लिम कुटुंबातील मुलींना गाणं गाण्याची परवानगी नव्हती. मात्र झीनत अमान यांनी मुनिजा यांच्याकडे हट्ट केला आणि अखेर त्या नाझियाला बॉलिवूडमध्ये पाठवण्यासाठी तयार झाल्या.
नाझियाला फिरोज खान दिग्दर्शित ‘कुर्बानी’ या चित्रपटातील गाणं गाण्यासाठी साइन केलं होतं. अवघ्या पंधरा वर्षांच्या नाझियाने शाळेचा गणवेश परिधान करून ‘कुर्बानी’मधील ‘आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आये…’ हे गाणं गायलं होतं. त्याकाळी हे गाणं तुफान गाजलं होतं. या गाण्यासाठी नाझियाला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार पटकावणारी नाझिया पहिली पाकिस्तानी गायिका ठरली होती. त्यानंतर 1981 मध्ये तिने म्युझिक अल्बम ‘डिस्को दिवाने’मध्ये गाणी गायली आणि हा अल्बम जगभरात हिट झाला.
नाझियाने तिच्या प्रोफेशनल आयुष्यात बरीच लोकप्रियता मिळवली. मात्र खासगी आयुष्यात तिला बरीच दु:खं सहन करावी लागली. 1995 मध्ये तिने कराचीमधल्या एका बिजनेसमनशी लग्न केलं. मात्र त्या बिझनेसमनने त्याच्या आधीच्या दोन लग्नांबद्दल खोटं सांगून नाझियाशी लग्न केलं. नाझियाला जेव्हा पतीच्या विवाहबाह्य संबंधाविषयी समजलं, तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला होता 2000 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नाझियाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल बरंच काही सांगितलं होतं. त्याचवर्षी तिचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर काही वेळात तिला कॅन्सरचं निदान झालं. पाच वेळा किमोथेरेपी झाल्यानंतर नाझियाची प्रकृती खालावली. मृत्यूच्या काही दिवस आधी नाझियाच्या कुटुंबीयांना सांगण्यात आलं की तिच्या पतीने हळूहळू तिला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. ऑगस्ट 2000 मध्ये नाझियाचं निधन झालं आणि या जगाने अत्यंत प्रतिभावान गायिकेला गमावलं.