Aaradhya Bachchan | फेक न्यूज देणाऱ्या युट्यूब चॅनल्सविरोधात आराध्या बच्चनने घेतली हायकोर्टात धाव
डिसेंबर 2021 मध्ये अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर त्याची मुलगी आराध्याला ट्रोल करणाऱ्या सडेतोड उत्तर दिलं होतं. "मी स्वत: सेलिब्रिटी असल्याने माझ्यावर झालेल्या टीकांना मी सहन करू शकतो पण आराध्याला लक्ष्य करणं हे मला पूर्णपणे अस्वीकार्य आहे," असं तो म्हणाला होता.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक – ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आराध्याने काही युट्यूब चॅनलविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तिच्या प्रकृतीविषयी खोटी बातमी दिल्याबद्दल तिने हे पाऊल उचललं आहे. याप्रकरणी आज (20 एप्रिल) रोजी सुनावणी होणार आहे. बॉलिवूड टाइम आणि बॉलिवूड चिंगारी अशा काही युट्यूब चॅनल्सची नावं त्यात समाविष्ट आहेत. 11 वर्षीय आराध्याने दाखल केलेल्या या याचिकेत दहा युट्यूब चॅनल्सना तिच्याबद्दलचे व्हिडीओ ‘डी-लिस्ट’ आणि ‘डिॲक्टिव्हेट’ करण्याची मागणी केली आहे. या खोट्या बातम्या आणि व्हिडीओंमुळे आराध्याच्या प्रायव्हसीचा भंग झाला आहे आणि बच्चन कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे, असंही त्यात म्हटलंय.
हायकोर्टात याचिका दाखल
आनंद अँड नाईक यांच्याद्वारे आराध्याने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटलंय, “या युट्यूब चॅनल्सचा एकमेव हेतू म्हणजे बच्चन कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा बेकायदेशीरपणे वापर करून नफा कमावणं इतकंच आहे. फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना होणारं नुकसान लक्षात न घेता त्यांनी हे काम केलं आहे.” याप्रकरणात त्यांनी गुगल एलएलसी आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (तक्रार सेल) यांनाही पक्षकार बनवण्यात आलं आहे.
आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना अभिषेकचं उत्तर
डिसेंबर 2021 मध्ये अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर त्याची मुलगी आराध्याला ट्रोल करणाऱ्या सडेतोड उत्तर दिलं होतं. “मी स्वत: सेलिब्रिटी असल्याने माझ्यावर झालेल्या टीकांना मी सहन करू शकतो पण आराध्याला लक्ष्य करणं हे मला पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ते मी सहन करणार नाही. मी सेलिब्रिटी आहे, त्यामुळे मला ट्रोल करण्यापर्यंत ठीक आहे. पण माझ्या मुलीला त्यात ओढू नका. जर तुम्हाला खरंच काही म्हणायचं असेल तर तोंडासमोर येऊन बोला”, असं तो म्हणाला होता.
आराध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर
आराध्याला अनेकदा ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत विविध कार्यक्रमांमध्ये पाहिलं जातं. त्यावरून ती शाळेत जाते की नाही, तिला इतक्या सुट्ट्या कशा मिळतात, असा सवाल करत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. त्यावर अभिषेकने चोख उत्तर देत ट्रोलर्सना गप्प केलं होतं. ‘शनिवार-रविवार सगळ्या शाळांना सुट्ट्या असतात. त्यामुळे कृपया या गोष्टींचा बाऊ करू नका’, असं तो म्हणाला होता.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी 20 एप्रिल 2007 रोजी लग्नगाठ बांधली होती. ऐश्वर्याने 16 नोव्हेंबर 2011 रोजी आराध्याला जन्म दिला.