दिल्ली: 13 जून, 1997 रोजी दुपारी 3 वाजता दिल्लीतील उपहार सिनेमामध्ये ‘बॉर्डर’ चित्रपटाचा शो सुरू असताना आग लागली. या आगीमुळे थिएटरमध्ये अडकून सुमारे 59 लोकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. तर चेंगराचेंगरीमुळे 103 जण गंभीर जखमी झाले होते. देशाच्या इतिहासातील या अत्यंत अत्यंत भयावह आगीच्या घटनेवर वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
या सीरिजमध्ये अभिनेता अभय देओल हा शेखर कृष्णमूर्ती यांची भूमिका साकारतोय. उपहार थिएटरमधील आगीच्या घटनेत शेखर कृष्णमूर्ती यांच्या दोन्ही मुलांचं निधन झालं होतं. सीरिजमध्ये अभिनेत्री राजश्री देशपांडे ही त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. जवळपास 18 वर्षांपेक्षा जास्त काळ ते न्यायासाठी लढतात.
‘ट्रायल बाय फायर’ या वेब सीरिजचा ट्रेलर शेअर करत अभयने लिहिलं, ’13 जून 1997 रोजी घडलेल्या घटनेमुळे शेकडो कुटुंबीयांचं आयुष्य बदललं. ट्रायल बाय फायरमध्ये नीलम आणि शेखर कृष्णमूर्ती या दाम्पत्यासोबतच इतर अशा कुटुंबीयांचा न्यायासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.’
करिअरमधील ही सर्वांत कठीण भूमिका होती, अशी भावना अभयने याआधीच्या एका पोस्टमध्ये व्यक्त केली होती. ‘मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी ही सर्वांत कठीण भूमिका होती. मी यापूर्वी सत्यकथांमध्ये काम केलं आहे. परंतु ही सर्वांत दु:खद घटना आहे. नीलम आणि शेखर कृष्णमूर्ती यांना दोन दशकांहून अधिक काळ न्यायासाठी संघर्ष करावा लागला’, असं त्याने लिहिलं.
ट्रायल बाय फायर ही वेब सीरिज येत्या 13 जानेवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.