पती रामलल्लाच्या दर्शनाला, तर पत्नी संसदेत..; प्रसिद्ध गायकाचा अमिताभ-जया बच्चन यांना टोमणा
गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. गाण्यांसोबतच ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अमिताभ आणि जया बच्चन यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
गायक अभिजीत भट्टाचार्य हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. आजवर त्यांनी पाकिस्तानविरोधात, कथित लैंगिक शोषण आरोपांबद्दल, रिअॅलिटी शोजच्या परीक्षकांविरोधात, शाहरुख खानसोबतच्या वादाबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते पुन्हा एकदा बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. अभिजीत यांनी स्वत:ला बॉलिवूडमधील एकमेव खरा देशभक्त म्हणत इतर सर्वजण फक्त दिखावा करतात अशी टीका केली होती. त्यावर आता ते म्हणाले, “सर्वांत मोठा मूर्खपणा आहे. मी एकच वाक्य म्हणेन, तुमचं आयुष्य बलिदान करू नका, देशभक्तीसाठी नाटक करा, पण खरे हिरो बनू नका. इथे लोकांना पैसे दिले जातात. पैसे देऊन त्यांना देशभक्त बनवलं जातं. देशभक्ती निभावण्यासाठी त्यांना लाच दिली जाते. बॉलिवूडमधील एकमेव देशभक्त असल्याबद्दल मला खूप मोठी किंमत मोजावी लागली.”
कोणाचंही नाव न घेता ते पुढे म्हणाले, “बॉलिवूडमधील एकही व्यक्ती देशभक्त नाही. इथे एक पती काही वेगळं बोलतो आणि त्याची पत्नी संसदेत जाऊन खिल्ली उडवते. कोणी रामलल्लाच्या दर्शनासाठी जातंय, तर त्यांची पत्नी ज्या पक्षात आहे, तो पक्ष त्यांना शिव्या देतो. त्यामुळे पैसे देऊन कोणाकडून देशभक्ती करून घेऊ नका. मी पैसे कमावले आणि देशभक्तीत खूप काही गमावलंय. आता मी जो आहे तसाच आहे. मी फक्त गाणी गाणार आणि लोकांचं मनोरंजन करणार.”
खरा देशभक्त असल्याने त्यांना बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप मोठी किंमत मोजावी लागली, असं अभिजीत यांना म्हणणं आहे. त्यांनी कोणाचं नाव जरी घेतलं नसलं तरी आपल्या वक्तव्यातून त्यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली होती. तर त्यांची पत्नी आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन अनुपस्थित होत्या.
अभिजीत यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. हिंदीसह त्यांनी बंगाली, मराठी, नेपाळी, तमिळ, भोजपुरी, पंजाबी आणि ओडिया या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. दशकभराहून जास्त काळापासून ते बॉलिवूडची गाणी गात आहेत. अभिनेता आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान, सनी देओल, गोविंदा, संजय दत्त, अक्षय कुमार, अजय देवगण, रणबीर कपूर यांसारख्या अनेक अभिनेत्यांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत.