‘अन् अचानक एकेदिवशी..’; अभिजीत खांडकेकरची भावूक पोस्ट
अभिनेता अभिजीत खांडकेकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. 'अडीच वर्षांचा प्रवास आज अखेर संपतोय. प्रत्येक मालिकेच्या निमित्तानं कलाकारांचं एक नवं कुटुंब तयार होतं.' असं त्याने म्हटलंय.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच या मालिकेच्या अखेरच्या भागाचं शूटिंह पार पडलं. बाप-लेकीची भेट होऊन या मालिकेचा शेवट गोड होणार आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अभिजीत खांडकेकर याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. मालिकेच्या सेटवरील काही फोटो पोस्ट करत त्याने इन्स्टाग्रामवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अडीच वर्षांचा प्रवास संपल्यानंतर मनात कोणते विचार सुरू आहेत, हे त्याने शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिजीत खांडकेकरची पोस्ट-
‘अडीच वर्षांचा प्रवास आज अखेर संपतोय. प्रत्येक मालिकेच्या निमित्तानं कलाकारांचं एक नवं कुटुंब तयार होतं. त्यांच्या बरोबर आम्ही हसतो, रडतो, भांडतो, खिदळतो आणि अचानक एकेदिवशी आता उद्याचा कॉल टाइम येणार नाही, “ए तू किती वाजता उद्या?”, “आज डब्यात तूझ्यासाठी खास आणतेय हा.”, “ च्यायला ट्राफिक लागला यार आज खूप”, “चलो चलो जल्दी घर जाना है” हे सगळे संवाद बंद होणार ही कल्पनाच सहन होत नाही. आता हा चॅप्टर संपवून नवीन काहीतरी सुरू होईल हे सिंक इन व्हायलाच वेळ लागतो. पण आम्हा ॲक्टर्सचं हे असंच असतं. तरीही ‘तुझेच..’च्या निमित्ताने तयार झालेले हे बंध आयुष्यभरासाठी आहेत’, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिलं, ‘अवनी तायवडे, अवनी जोशी म्हणजेच स्वरा आणि पिहूने मला बापपणाचा अनुभव दिला. कांचन गुप्तेनं आईसारखी माया दिली. सचिन, उमेश , शैलेश , हार्दिक , विघ्नेश , केदार , प्रथमेश, सागर ,अभिजीतच्या रूपात भाऊ भेटले. पल्लवीसारखी आदर्श वहिनी, बहीण भेटली. प्रिया, तेजस्विनी, उर्मिलासारख्या आयुष्यभराच्या मैत्रिणी.. प्रत्येकाबद्दल भरपूर लिहिता येईल… पण ते लिहिण्यापेक्षा एका कडकडीत मिठीतून जास्त नीट पोहोचेल. सतिश राजवाडे सर, अजिंक्य, मधुरा, महिपालजी, अभिजीत गुरू, वर्षा, उत्तरा, सुवर्णा ताई, संपूर्ण ट्रम्पकार्ड टीम आणि स्टार प्रवाह टीमचे मनापासून आभार. रसिक प्रेक्षकांना दंडवत, तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नाही.’
”तुझेच मी गीत गात आहे’च्या निमित्ताने वडील आणि मुलीची शेवटी भेट होते आणि त्याचा शेवटचा भाग आज ‘फादर्स डे’च्या निमित्ताने प्रसारित होतोय. याहून अनोखा योगायोग अजून कुठला. पुन्हा नव्या भूमिकेतून आपल्या समोर येत राहीनच. असंच प्रेम आणि आशिर्वाद असू द्या’, अशा शब्दांत त्याने कृतज्ञता व्यक्त केली.
अभिजीतच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव होतोय. या मालिकेत अभिजीतसोबत काम करणारी अभिनेत्री प्रिया मराठेनं लिहिलं, ‘खूप खूप प्रेम’. अभिजीतची पत्नी सुखदानेही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला तुझ्यावर खूप अभिमान आहे. अशीच प्रगती करत राहा’, असं तिने लिहिलं आहे.