‘बेरोजगार’ म्हणणाऱ्याला अभिषेकचं सडेतोड उत्तर; ट्रोलरची बोलतीच बंद!
अभिषेकला ट्रोलरने म्हटलं 'बेरोजगार'; उत्तर वाचून नेटकऱ्यांनीही केलं कौतुक
मुंबई- अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. इन्स्टाग्राम, ट्विटरच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या सतत संपर्कात असतो. मात्र अनेकदा त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागतो. अशा वेळी तो ट्रोलर्सना सडेतोड उत्तरसुद्धा देतो. अशाच एका उत्तरामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ट्विटरवर एका युजरने अभिषेकला बेरोजगार म्हटलंय. त्याला अभिषेकने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
नेमकं काय घडलं?
एक पत्रकाराने सणासुदीच्या काळात जाहिरातींनी भरलेल्या वर्तमानपत्राचा फोटो ट्विटरवर शेअर केला. त्यावर अभिषेकने तिला विचारलं, “तुम्ही आतासुद्धा वर्तमानपत्र वाचता का?” याचं उत्तर संबंधित पत्रकाराने तर दिलं नाही. मात्र एका ट्विटर युजरने अभिषेकला डिवचलं. “बुद्धिमान लोक वाचतात, तुमच्यासारखे बेरोजगार नाही.”
Intelligent people do. Not unemployed people like you?
— CJain (@CJain3018) October 22, 2022
बेरोजगारीवरून ट्रोल करणाऱ्याला अभिषेकने उत्तर दिलं, “ओह हां, उत्तरासाठी धन्यवाद! पण बुद्धिमानी आणि रोजगार या दोन्ही गोष्टींचा काहीच संबंध नाही. तुम्ही स्वत:कडेच पाहा. मी हे खात्रीने सांगू शकतो की तुमच्याकडे नोकरी असेल. पण त्याचसोबत ही गोष्टसुद्धा पूर्ण खात्रीने बोलू शकतो की तुम्ही बुद्धिमान नाहीत (तुमच्या ट्विटवरून मी हे बोलू शकतो).”
Oh, I see! Thank you for that input. By the way, intelligence and employment aren’t related. Take you for example. I’m sure you’re employed, I’m also sure (judging by your tweet) that you’re not intelligent! ??
— Abhishek ???????? (@juniorbachchan) October 22, 2022
अभिषेकचं उत्तर वाचताच संबंधित ट्रोलरने अखेर त्याची माफी मागितली. ‘रिप्लाय मिळवण्याची निंजा टेकनिक. तुम्हाला दुखावलं असेल तर माफी मागतो’, असं त्याने लिहिलं.
नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत अभिषेकची बहीण श्वेता बच्चन हिने भावाच्या ट्रोलिंगविषयी राग व्यक्त केला होता. “माझं रक्त खवळतं”, अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया दिली होती. अभिषेकची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाणं अजिबात पटत नसल्याचं तिने बोलून दाखवलं.