ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांना आता अभिषेकनेच दिली हवा
ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर अशी एक पोस्ट लाईक केली आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही पोस्ट घटस्फोटाशी संंबंधित होती. अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर जोडपे घटस्फोटाला कसे सामोरे जातात, याविषयीचा हा लेख होता.
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहेत. मात्र त्यावर अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांच्या वेगवेगळ्या एण्ट्रीनेही नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशातच अभिषेकने इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट लाईक केली आहे. ही पोस्ट घटस्फोटाशी संबंधित आहे. एका पत्रकाराने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधिची पोस्ट शेअर केली होती. त्यात ‘इंडियन इक्स्प्रेस’च्या ‘आय मॅगझिन’मधील लेख होता. ‘जेव्हा प्रेम सोपं होणं थांबतं,’ असं त्या पोस्टवर लिहिलेलं होतं. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये घटस्फोटाविषयी भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या. हीच पोस्ट आता अभिषेकने लाईक केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘घटस्फोट कुणासाठीही सोपा नसतो. वृद्ध जोडप्यांना हात धरून रस्ता ओलांडतानाचे व्हिडीओ पाहून ते क्षण आपणसुद्धा कधीतरी अनुभवावेत असं कोणाला वाटत नाही किंवा ‘हॅपिली एव्हर आफ्टर’ची (आयुष्यभर आनंदाने जगावं) स्वप्नं कोण पाहत नाहीत? तरीसुद्धा आयुष्य कधीकधी आपल्या अपेक्षेप्रमाणे उलगडत नाही. पण अनेक दशकं एकत्र राहिल्यानंतर, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनल्यानंतर आणि अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी एकत्र अनुभवल्यानंतर, एकमेकांवर बराच काळ अवलंबून राहिल्यानंतर लोक घटस्फोटाचा सामना कसा करतात?’ अभिषेकने हीच पोस्ट लाईक केली आहे.
ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा असतानाच अंबानींच्या कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकने वेगवेगळी एण्ट्री केली होती. एकीकडे अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नंदा, अभिषेक बच्चन, अगस्त्य नंदा हे सर्वजण एकत्र आले होते. तर फक्त ऐश्वर्या आणि आराध्या हे नंतर आले. किमान अभिषेकने तरी त्या दोघींसोबत यायला हवं होतं, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी दिले होते. बच्चन कुटुंबीय आणि ऐश्वर्या यांच्यात नक्कीच काही आलबेल नाही, अशाही चर्चा होत्या.
2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास 16 वर्षे झाली आहेत. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.