मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला आहे.हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. बिग बींच्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत. खु्द्द अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून अपघाताची माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या माहितीनुसार ॲक्शन सीन शुट करताना दुखापत झाली. सध्या बिग बी मुंबई याठिकाणी त्यांच्या निवास स्थानी आराम करत आहेत.
अमिताभ बच्चन म्हणाले, ‘हैदराबाद याठिकाणी शुटिंग सुरु होती तेव्हा ॲक्शन सीन शुट करत असताना मी जखमी झालो आहे. अपघातानंतर शुटिंग रद्द करण्यात आली आहे. डॉक्टरांनी तपासणी केली आणि हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयातील डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं आहे. आता मी घरी परतलो आहे. आता काळजी करण्याचं कारण नाही. पण प्रचंड त्रास झाला. हलण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी देखील त्रास होत होता…’ असं देखील बिग बी म्हणाले.
पुढे बिग बी म्हणाले, ‘प्रकृती स्थिर होण्यासाठी काही आठवडे लागतील. वेदना होत असल्यामुळे डॉक्टरांनी औषधं दिली आहेत. त्यामुळे जी कामे आहेत, ती काही दिवसांसाठी थांबवण्यात आली आहेत. मी आता जलसामध्ये आराम करत आहे. काही महत्त्वाचं काम असेल तरच चालत आहे…’
अमिताभ बच्चन कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांपर्यंत पोहोवत असतात. अनेक वर्ष सिनेमांच्या माध्यामातून चाहत्यांच्या मनार राज्य करणाऱ्या बिग बी साता समुद्रापार देखील प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या अपघाताची बातमी ऐकताच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. पण खुद्द बिग बींनी काळजी करण्याचं काही कारण नसल्याचं सांगितलं आहे.