‘चुकी झाली असेल माफ करा पण…’, नाना पाटेकर यांनी खरंच चाहत्याला मारलं? सत्य अखेर समोर
Nana Patekar : फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला नाना पाटेकर यांनी खरंच मारलं? व्हायरल व्हिडीओनंतर सर्वत्र खळबळ, खुद्द नाना पाटेकर यांनी सोडलं मौन... व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी साधला नाना पाटेकर यांच्यावर निशाणा.. काय आहे सत्य?
Nana Patekar : ‘नटसम्राट’, ‘क्रांतीवीर’, ‘तिरंगा’, ‘प्रहार’, ‘शक्ती’ यांसारख्या असंख्य सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत अभिनेते नाना पाटेकर यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. वयाच्या 72 व्या वर्षी देखील नाना पाटेकर चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. दरम्यान, नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये नाना पाटेकर फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला मारताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी नाना पाटेकर यांच्यावर निशाणा साधला. पण आता व्हायरल व्हिडीओवर खुद्द नाना पाटेकर यांनी मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नाना पाटेकर यांची चर्चा रंगली आहे.
नाना पाटेकर यांनी एक्सवर स्वतःचा एक व्हिडीओ पोस्ट करत घडलेली घटना सांगितली आणि माफी देखील मागितली आहे. नाना पाटेकर म्हणाले, ‘सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सिनेमाची शुटिंग सुरु होती. सीनमध्ये एक मुलगा माझ्या मागून येणार होता आणि मी त्याला मारणार होतो.. असा सीन आम्हाला शूट करायचा होता…’
‘आमची एक रिहर्सल झाली होती, दिग्दर्शक म्हणाले पुन्हा एकदा रिहर्सल करुया. आम्ही रिहर्सल सुरु करणार तेवढ्यात व्हिडीओत दिसणार मुलगा माझ्या मागून आला आणि मी त्याला मारलं… मला नव्हतं माहिती तो कोण आहे. पण जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा त्याठिकाणी आमचा माणूस नव्हता…’
The video which is circulating on social media has been misinterpreted by many. What actually happened was a misunderstanding during the rehearsal of a shot from my upcoming film ‘Journey’. pic.twitter.com/UwNClACGVG
— Nana Patekar (@nanagpatekar) November 15, 2023
‘मी मागे वळताच व्हिडीओ दिसणारा मुलगा पळून गेला. त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मी कोणाला मारलेलं नाही. चुक झाली असेल तर माफ करा, कोणाचं मन दुःखावलं गेलं असेल तर माफ करा पण गैरसमज करुन घेऊ नका…’ असं देखील नाना पाटेकर व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.
पुढे नाना पाटेकर म्हणाले, ‘मी चाहत्यांना कधीही फोटोसाठी नाही म्हणत नाही. असंख्य चाहते माझ्यावर प्रेम करतात. त्यांच्यासोबत मी असं कधीच वागू शकत नाही…’ असं देखील नाना पाटेकर व्हिडीओमध्ये म्हणाले. सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांची चर्चा सुरु आहे. अनेकांनी नाना पाटेकर यांच्या व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाना पाटेकर यांचा चाहत्याला मारण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आझाद अधिकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमिताभ ठाकूर यांनी नाना पाटेकर यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.